महाराष्ट्र

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनस्थळी पोलिसांनी केला लाठीचार्ज

जालना : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जालन्यात आंदोलन सुरू होते. या आंदोलनस्थळावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये काही आंदोलक जखमी सुद्धा झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २९ ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह काहीजण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात आंदोलनाला बसले होते. हे आंदोलन चिघळू नये म्हणून पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, याला आंदोलकांनी विरोध केला आणि त्यानंतर लाठीचार्ज झाल्याची माहिती समोर आली आहे.
मराठा समाजाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजातील बांधवांनी २९ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर – सोलापूर महामार्गावर मोर्चा काढला होता. त्यानंतर त्यांनी आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलकांसोबत फोनवरुन चर्चा केली आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. पण आंदोलकांनी आपली मागणीवर ठाम लावून धरत उपोषण सुरूच ठेवले. त्यानंतर शुक्रवारी (१ सप्टेंबर २०२३) पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आंदोलकांनी पोलिसांना विरोध केला. यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.
नेमकं घडलं तरी काय?
  • जालन्यात अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागण्यासाठी उपोषण सुरू होते.
  • मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजातील बांधवांनी २९ ऑगस्टपासून हे आंदोलन सुरू केलं.
  • मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह १० जण उपोषणाला बसले होते.
  • आंदोलक आणि मुख्यमंत्री यांच्यात फोनवरुन चर्चा सुद्धा झाली होती. मात्र, आंदोलक उपोषणावर ठाम होते.
  • सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास पोलीस आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यानंतर आंदोलक आणि पोलीस यांच्यात वाद झाला.
  • यावेळी प्रकरण चिघळल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला
  • पोलिसांनी लाठीचार्ज केल्यावर आंदोलकांनी दगडफेक केल्याची माहिती
जालन्यातील या घटनेत १० ते १२ पोलीस जखमी झाले आहेत. आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची माहिती घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत, जनतेने शांतता राखावी असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
जालन्यात पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्ज नंतर धुळे-सोलापूर मार्गावर जाळपोळ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संतप्त नागरिकांनी मार्गावर आग लावली. या जाळपोळीमुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button