पुण्यात दारुच्या नशेत मित्राच्याच डोक्यात कुर्हाडीने केले वार

पुणे : मित्राच्या घरातच दारु पित बसले असताना झालेल्या वादात एकाने आपल्याच मित्राच्या डोक्यात कुर्हाडीने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जावेद मुजावर (वय ५०, रा. मुक्तानंद सोसायटी, रो हाऊस, फातिमा नगर, वानवडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत त्यांच्या पत्नी नाजमीन जावेद मुजावर (वय ४८) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ४८५/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रियाज शेख (वय ५०, रा. मंडई) याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वानवडीतील फातिमा नगरमध्ये मंगळवारी रात्री पावणेदहा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मुक्तानंद सोसायटीत रो हाऊस आहे. त्यांचे पती जावेद व त्यांचे मित्र रियाज शेख हे बागेतील पत्र्याच्या खोलीमध्ये दारु पित बसले होते. त्यांच्यात पैशांवरुन वाद सुरु झाला. तेव्हा बागेतील झाडे कापण्यासाठी वापरत असलेली लोखंडी कुहाडीने रियाज याने जावेद याच्या कानावर, डोक्यात व हाताचे कोपरावर वार करुन गंभीर जखमी केले. जावेद यांचा आवाज ऐकून फिर्यादी तेथे गेल्या असता त्यांना पोलिसांत तक्रार केली तर बघुन घेण्याची धमकी देऊन रियाज शेख पळून गेला. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक गिरमकर तपास करीत आहेत.



