महाराष्ट्रमुंबई

महाराष्ट्र मी लाचारांचा होऊ देणार नाही ! उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

मुंबई : माझी तळमळ सुरू आहे ती हिंदुस्थानसाठी आणि माझ्या महाराष्ट्रासाठी सुरू आहे, हा हिंदुस्थान आणि महाराष्ट्र मी लाचारांचा होऊ देणार नाही, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपला ठणकावले. पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे नेते व माजी प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी असंख्य कार्यकर्त्यांसह आज शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ‘सत्ताधारी पक्षातील लोक विरोधी पक्षात येणे ही राजकारणातील दुर्मिळ नव्हे तर अशक्य गोष्ट आहे. त्यामुळे एकनाथ पवार, चेतन पवार आणि कार्यकर्त्यांचे आपल्याला काwतुक आणि अभिमान आहे,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.

केवळ सतरंज्या उचलण्यासाठीच तुम्ही पक्ष वाढवला का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना केला होता. त्याची आठवण यावेळी त्यांनी करून दिली. ‘पिंपरी-चिंचवड हे पुण्यात येते. आता तिथे अजित पवार पालकमंत्री आहेत. महाविकास आघाडीचे सरकार असतानाही अजितदादा पुण्याचे पालकमंत्री होते. त्यावेळी त्यांच्याविरुद्ध भाजपने रान उठवले होते. मोदींनीही त्यांच्यावर ७० हजार कोटींच्या घोटाळय़ाचे आरोप केले. पुण्यात भाजपने चांगली बांधणी केल्यामुळे शहरात महापालिकेमध्ये भाजपचे ९८ उमेदवार निवडून आले होते. आता अजित पवार भाजपसोबत गेल्याने ‘ती’ बांधणी कुणाच्या हातात दिली? भाजपवाले त्यांना चक्की पिसायला पाठवणार होते मग आता ती बांधणी कोण पिसून टाकणार? यासाठी तुम्ही मेहनत केली होती का?’ असे सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

एकनाथ पवार यांनी भाजपचे शहराध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख, पक्ष प्रवक्ते अशी विविध पदे भूषवली होती. पिंपरी-चिंचवड महापालिकेत ते भाजपचे गटनेतेही होते. टाटा मोटर्समध्ये कामगार नेते म्हणूनही ते परिचित आहेत. नांदेडमधील लोहा-पंधारचा विधानसभा मतदारसंघाचा पुढचा आमदार हा शिवसेनेचाच असेल आणि नांदेडमध्ये शिवसेनेचाच खासदार जिंकेल, असा विश्वास एकनाथ पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रत्येक मराठी माणूस हा शिवसैनिक असतो आणि त्याला योग्य वेळी शिवसेनेत यावेच लागते, तसेच एकनाथ पवार हे योग्य वेळी पक्षात आले आहेत, असे याप्रसंगी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत म्हणाले. भाजपच्या संघटना वाढीत योगदान देणारा कार्यकर्ता आज उद्धव ठाकरे यांना बळकट करण्यासाठी आला, असे प्रशंसोद्गारही त्यांनी काढले.

शिवसेनेने हिंदुत्व सोडले अशी टीका करणाऱया मिंधे गटाचाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी खरपूस समाचार घेतला. शिवसेनेने हिंदुत्व सोडून काँग्रेसला जवळ घेतले, शिवसेनेची काँग्रेस झाली असे आरोप अनेक बाटगे करतात. पण २५-३० वर्षे भाजपसोबत राहून शिवसेनेची भाजप झाली नाही तर दोन वर्षांत काँग्रेस कशी होईल? शिवसेना म्हणजे काय मिंधे गट वाटला काय? असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.

एकनाथ पवार यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करतानाच संघटकपदी त्यांची नियुक्ती केली. शिवसेनाप्रमुख आणि शिवसैनिक ही दोनच पदे शिवसेनेत महत्त्वाची आहेत असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगायचे, या दोघांमधला दुवा बनण्याचे काम तुम्हाला संघटक म्हणून करायचे आहे, असे आवाहन त्यांनी पवार यांना केले.

एकनाथ पवार यांच्यासोबतच पिंपरी-चिंचवडमधील भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी चेतन पवार यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे उद्धव ठाकरे यांनी पक्षात स्वागत केले. भाजप युवा मोर्चामधील अनुभव पाहता तुम्ही तसेच काम युवा सेनेमध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करा. तुम्हाला लवकरच युवासेनेमध्ये जबाबदारी दिली जाईल, असे यावेळी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button