महाराष्ट्र

दामोदर नाटय़गृह पुनर्बाधणीच्या कामासाठी १ नोव्हेंबरपासून बंद

मुंबई : मुंबईच्या सांस्कृतिक आणि रंगभूमीवरील इतिहासाची गौरवशाली परंपरा अनुभवत शतकी वाटचाल पूर्ण केलेल्या दामोदर नाटय़गृहावर पडदा पडणार आहे. कामगार वर्गातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने उभ्या राहिलेल्या या नाटय़गृहाची जीर्ण इमारत पाडून नाटय़गृहाची पुनर्बाधणी करण्यात येणार आहे. या कामाला १ नोव्हेंबरपासून सुरूवात होणार असून, साडेतीन-चार वर्षांत आधुनिक शैली आणि सोयीसुविधांनी युक्त नवे नाटय़गृह नाटय़रसिकांच्या सेवेत येईल.

कामगार रंगभूमीवरील कलाकार, मुंबईतील विविध समाजसंस्थांचे कार्यक्रम, नाटकांच्या तालमी अशा विविध कामांसाठी नाटय़प्रेमींचे हक्काचे व्यासपीठ ही परेलच्या दामोदर नाटय़गृहाची गेल्या कैक वर्षांची ओळख. १९११ मध्ये ‘द सोशल सर्व्हिस लीग’ या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. विविधांगी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या या संस्थेने मुंबईच्या कामगार वर्गातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून १९२२ मध्ये दामोदर नाटय़गृहाची उभारणी केली. दरवर्षी या भागात साचणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे दामोदर नाटय़गृहाची इमारत, तेथील खुच्र्या आणि शाळेची इमारत यांचे नुकसान होते. करोनानंतर ४ ते ५ वेळा आम्ही नाटय़गृहाची डागडुजी केली. सातत्याने डागडुजी करणे शक्य नाही. शाळेत साडेतीन हजार विद्यार्थी सध्या शिकत असल्याने शाळेची इमारतही पाडता येणार नाही. त्यामुळे नाटय़गृह पाडणे हाच पर्याय असल्याचे ‘द सोशल सर्व्हिस लीग’चे अध्यक्ष आनंद माईणकर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button