घरे विकली जात नसल्याने सिडकोचा आरक्षण बदलाचा प्रस्ताव; घरे आरक्षण नियम शिथिल

नवी मुंबई : नवी मुंबईतील वेगवेगळ्या उपनगरांमध्ये भव्य गृहनिर्माण योजनेच्या (मास हार्ऊंसग स्किम) माध्यमातून २३ हजार ३३७ घरांची उभारणी करणाऱ्या सिडकोला वेगवेगळ्या आरक्षणांच्या माध्यमातून आरक्षित कराव्या लागणाऱ्या घरांचा भार आता नकोसा होऊ लागला आहे.
सिडकोच्या गृहनिर्माण योजनेत वेगवेगळ्या घटकांसाठी ३० टक्के घरांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. २०१८ सालापासून सिडको उभारत असलेल्या वेगवेगळ्या गृहप्रकल्पांमधील ९ हजार ८५८ आरक्षित घरांच्या खरेदीसाठी जेमतेम ५ हजार ८७४ अर्ज प्राप्त झाले असून त्यामध्येही ४००३ ग्राहक प्रत्यक्ष घर खरेदीसाठी प्राप्त ठरले आहे. त्यामुळे उरलेल्या ५ हजार ८५५ घरांच्या देखभालीचा भार सिडकोवर पडू लागला असून ही घरे विकताही येत नसल्याने नव्या योजनांमध्ये आरक्षणाचे नियम शिथिल करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.
नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, द्रोणागिरी, घणसोली या पाच उपनगरांमध्ये २०१८ पासून सिडकोने मोठया प्रमाणावर गृहप्रकल्पांची उभारणी सुरू केली आहे. नवी मुंबईसारख्या शहरात सर्वसामान्यांना तुलनेने स्वस्त घरांचा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी ही आखणी करण्यात आली. त्यानुसार सिडकोने २३ हजार ३३७ घरांच्या उभारणीचे काम हाती घेतले आहे. यापैकी काही प्रकल्प पूर्ण झाले असून खरेदीदारांना घरांचा ताबाही दिला आहे.
येत्या काळात प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून नवी मुंबईत एक आणि दोन बीएचके आकाराच्या ६७ हजार घरांची उभारणी करण्याचे ठरविण्यात आले आहे. सर्वच प्रकारांच्या घरांच्या खरेदीसाठी सिडकोला पुरेशा प्रमाणात अर्ज येत नसल्याचे गेल्या पाच वर्षांतील अनुभव आहे, अशी माहिती सिडकोतील एका वरिष्ठ प्रशासकीय सूत्राने दिली.
वेगवेगळ्या प्रकल्पांमधील आरक्षणाच्या वर्गवारीतील ५ हजार ८७७ घरे खरेदीविना पडून आहेत. या घरांच्या देखभाल, दुरुस्तीचा भारही सिडकोवर पडत आहे, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
दरम्यान आरक्षित वर्गातील घरांना पुरेशा प्रमाणात मागणी येत नसल्याने सिडकोने या प्रवर्गातील काही अटी शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यांसारख्या शासकीय संस्थांमधील कर्मचाऱ्यांनाही सिडकोची घरे खरेदी करता येणार आहेत. याशिवाय राज्यभरातील विविध ठिकाणचे पत्रकार आणि राज्यातील कोणत्याही ठिकाणच्या शासकीय प्रकल्पामुळे प्रकल्पग्रस्त ठरलेल्यांनाही सिडकोच्या घरांसाठी अर्ज करता येणार आहे.
सिडकोच्या विविध गृहप्रकल्पांमधील स्थिती
योजना एकूण अर्ज विजेत्यांची टक्केवारी
घरे – संख्या – संख्या
योजना २०१८ ३,८८३ ३,६९० १,८८८ ४८.६२%
योजना २०१९ १,८८६ ११७६ १,१५९ ६१.४५%
कोविड योद्धे योजना २२४ ३८ ३५ १५.६२%
जानेवारी २०२२ १,३४८ ३०३ ३०३ २२.४७%
ऑगस्ट २०२२ १,२२७ ४८८ ४३९ ३५.७७%
दिवाळी २०२२ १,२९० १७९ १७९ १३.८७%
एकूण ९,८५८ ५,८७४ ४,००३ ४०. ५०%



