राजकारण

ठाकरे गटाने आमदारांना बजावलेला व्हिपच बनावट; शिंदे गटाने केला दावा

मुंबई : सुरतमार्गे गुवाहाटीला गेलेल्या १६ आमदारांना शिवसेनेने बजावलेला व्हीप बनावट असल्याचा दावा आमदारांच्या वतीने शिंदे गटाच्या वकिलांनी सुनावणीत केला. मात्र, उद्धव ठाकरे गटाने हा दावा फेटाळून लावला. विधानपरिषद निवडणूक झाल्यानंतर गेल्या वर्षी २० जूनच्या रात्री शिवसेनेचे १६ आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उठाव करून सुरतमार्गे गुवाहाटीला गेले होते. हे आमदार संपर्काच्या बाहेर गेल्याचे लक्षात येताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू यांना तातडीने पक्षाची बैठक घेण्याचे आदेश दिले.

त्यानुसार, प्रभू यांनी सर्व आमदारांना व्हीप बजावला. मात्र, याच व्हीपमधील तारीख, जावक क्रमांक आणि त्यावरील सही यातील तांत्रिक मुद्दे काढत शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी प्रभू यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. तर याच तांत्रिक मुद्यावर व्हीप बनावट असल्याचा मुद्दा उपस्थित करून सुनावणीस वेगळ रंग देण्याचा प्रयत्न केला. आमदार अपात्रतेवर कालपासून मॅरेथॉन सुनावणी सुरू झाली आहे. या सुनावणीत शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांनी वारंवार व्हीप कसा चुकीचा आहे, यावरच लक्ष केंद्रित केले. जेठमलानी यांच्याकडूनही तशाच प्रकारच्या प्रश्नांची सरबत्ती सलग दुसऱ्या दिवशी सुनील प्रभू यांच्यावर करण्यात आली.

या प्रश्नांना सुनील प्रभू यांनीही शिताफीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्रावरील संदर्भ क्रमांकाच्या प्रश्नावर संभ्रम निर्माण झाल्याने तो पक्षाच्या कार्यालयीन कामकाजाचा भाग असल्याने आताच मला सांगता येणार नाही, असे उत्तर सुनील प्रभू यांनी दिले. यावर जेठमलानी यांनी हा व्हीपच बनावट असल्याचा दावा करत विधानसभा अध्यक्षांना आपला आक्षेप नोंदवून घेण्यास सांगितले.

व्हीप कोणत्या तारखेला, किती वाजता आणि किती आमदारांना जारी करण्यात आला, आमदार बेपत्ता होते म्हणून व्हीप काढला तर ते बेपत्ता आहेत, हे कशाच्या आधारावर ठरवले, किती आमदारांना व्हीप मिळाला आदी प्रश्नांचा भडिमार करून जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावर उत्तर देताना व्हीप २० तारखेला रात्री १०.३० ते ११.३० दरम्यान काढण्यात आला. रात्री उशिरा व्हीप काढल्याने त्यावर २१ जून २०२२तारीख टाकली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली. काही आमदार बेपत्ता असल्याचे वृत्तवाहिन्यांवरून कळल्याने व्हीप जारी करण्याचा त्यांनी आदेश दिले. त्यानुसार व्हीप जारी करण्यात आला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button