पिंपरी चिंचवड महापालिका शाळामध्ये दिल्लीतील शैक्षणिक मॉडेल होणार लागू

पिंपरी : दिल्लीतील शैक्षणिक व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी महापालिका शिक्षण विभागाच्या अठरा सदस्यांची कोअर टीम गेली होती. त्यांनी दिल्लीतील शैक्षणिक मॉडेल, व्यावसायिक शिक्षण संस्थांची पद्धती, पायाभूत सुविधा, प्रशासन, शिक्षक आणि मुख्याध्यापकांची क्षमता; विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात सामावून घेण्यासाठी केलेल्या उपाययोजना, यांचा अभ्यास केला. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहशहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, सहायक आयुक्त विजयकुमार थोरात, मुख्याध्यापक, शिक्षकांचा दौऱ्यात समावेश होता. दिल्ली शालेय शिक्षण मंडळ, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतील (एससीईआरटी) अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली.
दिल्लीच्या अभ्यास दौऱ्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यास मदत मिळणार आहे. या दौऱ्याचा अनुभव कोअर टीमला महापालिका शाळांमध्ये प्रभावी धोरणे आखण्यासाठी आणि नवकल्पना लागू करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. हा प्रयत्न महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावेल.
– शेखर सिंह, आयुक्त, महापालिका
आमचा भर केवळ शैक्षणिक दर्जा वाढविण्यावर नसून विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या अनुभवातील गुंतागुंत समजून घेण्यावरही होता. दिल्लीच्या सार्वजनिक शाळांमध्ये सर्वांगीण दृष्टिकोनावर भर देत शैक्षणिक कार्यपद्धतीला आकार देण्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक आणि पालकांच्या भूमिकांचा अभ्यास केला.
– तौसीफ परवेझ, कोअर टीम सदस्य
दिल्ली शिक्षण विभागाने सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात सामावून घेण्यासाठी, तसेच विद्यार्थ्यांची व्यावसायिक आणि संभाव्य कौशल्ये विकसित करण्यासाठी काही उपाययोजना राबविल्या आहेत. या अभ्यास दौऱ्यात आम्हाला त्या उपाययोजनांबाबत माहिती मिळाली आणि जवळून पाहता आल्या.
– चारुशीला फुगे, सहायक शिक्षिका, माध्यमिक विद्यालय, लांडेवाडी
चार-पाच वर्षांपूर्वी दिल्लीतील सरकारी शाळांचे चित्र खूपच वेगळे होते, परंतु तेथील प्रत्येक शिक्षकाने स्वत: जबाबदारी घेतली आणि मुलांमध्ये तसेच शाळेमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला. तेथील शिक्षकांसोबत पालक आणि अधिकारीही महत्त्वाची भूमिका बजावतात. महापालिका शाळांमध्येही असाच बदल घडावा यासाठी उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
– मनिषा सदावर्ते, महापालिका मुलांची शाळा, जाधववाडी



