महाराष्ट्र

रायगड जिल्ह्यातील केंबुर्लीत २०० खाटांचे रूग्णालय; राज्य शासनाकडून मान्यता

मुंबई : रायगड जिल्ह्यात सुसज्ज आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी महाड तालुक्यातील मौजे केंबुर्ली येथे २०० खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल स्थापन करण्यास राज्य सरकारने जीआरद्वारे मान्यता दिली आहे. भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे ही मागणी केली होती. हे रुग्णालय २५ एकर जागेवर उभारले जाईल. रायगड जिल्ह्यात महाड-पोलादपूर येथे छोटी छोटी आरोग्य केंद्रे उपलब्ध आहेत. मात्र तेथे सुसज्ज यंत्रसामुग्री नसल्याने नागरिकांची गैरसोय होते.

कोकण महामार्गांवर अनेकवेळा मोठे अपघात झाल्यावर जखमींना पनवेल-मुंबई येथे नेऊन उपचार करावे लागतात. वेळेत उपचार न मिळाल्याने अनेक नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला आहे, असेही दरेकर यांनी दाखवून दिले. पोलादपूर येथे उपजिल्हा आरोग्य केंद्र आहे. महाड येथे ट्रामा केअर सेंटर आहे. परंतु तेथे पुरेशी यंत्रणा उपलब्ध नाही, असेही दरेकर यांनी सांगितले होते. त्यानुसार शासनाच्या आरोग्य विभागाकडून रुग्णालयाच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकतेच तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आदिलाबाद येथे आले असता दरेकर यांच्या सांगण्यावरून त्यांनी तेथूनच प्रशासनाला सूचना दिल्या आणि याबाबतचा जीआर निघाला. ही माहिती दरेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button