महाराष्ट्र

मिरा भाईंदरमध्ये फ्लेक्स छपाईवर बंदी

भाईंदर : मिरा भाईंदर शहरात महापालिकेने उभारलेल्या होर्डिंग्जव्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी फलक (फ्लेक्स) लावण्यास मनाई करण्यात आली आहे. असे असतानाही अनेक ठिकाणी अनधिकृतपणे फलक लावले जात आहे. त्यामुळे फलक छापणाऱ्या प्रिंटर्सना महापालिकेने नोटीस बजावून बेकायदा फलक छापण्यास मनाई केली आहे.

शहरात अनेक ठिकाणी महापालिकेची परवानगी न घेताच फलक लावले जायचे. यात राजकीय व्यक्तींचा सर्वाधिक पुढाकार असायचा. अशा बेकायदा फलकबाजीमुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान तर होतच असे शिवाय शहरही विद्रूप होत आहे. यामुळे २०१८ मध्ये महासभेने शहरात फलकबंदी करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेने उभारलेल्या अधिकृत होर्डिंग्ज वगळता अन्यत्र कोणत्याही ठिकाणी फलक लावण्यास मनाई करण्यात आली. तसेच असे अनधिकृत फलक लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.
सुरुवातीची दोन ते तीन वर्षे या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा अनधिकृत फलकबाजीला जोर आला आहे. गल्लीबोळात, पथदिवे, झाडांना अनधिकृत फलक लावले जात आहेत. त्यावर महापालिकेकडून वेळोवेळी कारवाई केली जाते; मात्र तरीदेखील त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवणे महापालिकेला शक्य झालेले नाही. यासाठी प्रशासनाकडून आता फलकांची छपाई करणाऱ्यांनाच नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

क्यूआर कोड छापणे बंधनकारक : महापालिकेच्या अधिकृत होर्डिंग्ज व्यतिरिक्त अन्यत्र फलक लावण्यास मनाई आहे. त्यामुळे होर्डिंग्ज व्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी लावण्यासाठी फलकांची छपाई करू नये. शिवाय छापण्यात येणाऱ्या फलकावर छपाई करण्याऱ्यांची माहिती असलेला क्यूआर कोड छापावा, जेणेकरुन अनधिकृत फलक आढळल्यास संबंधित छपाई करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा या नोटीसद्वारे दिला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button