विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी आठ हजार पोलीस, हजार बसेस

पुणे : कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी रोजी साजरा होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी सुमारे वीस लाखांहून अधिक अनुयायी येणार असल्याने त्या दृष्टीने जय्यत तयारी केली आहे. दि. ३१ डिसेंबर आणि एक जानेवारीला सुमारे एक हजार बसेस, ११० एकरांवर वाहनतळ आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे आठ हजार पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
कोरेगाव भीमा येथील अभिवादन सोहळ्याच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस सहआयुक्त रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, पीएमपीचे महाव्यवस्थापक संजय कोलते, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपविभागीय अधिकारी संजय आसवले उपस्थित होते.
पीएमपीकडून दि. ३१ डिसेंबर आणि एक जानेवारी रोजी सुमारे एक हजार ५० गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार ३१ डिसेंबरला ४७५ बस दोन शिफ्टमध्ये चालवल्या जातील. एक जानेवारीला ५७५ बस दोन्ही बाजूने चालविण्यात येणार आहेत. गाड्यांसाठी शिक्रापूर येथे पार्किंगच्या ठिकाणी ३१ डिसेंबरला तेराशे वाहक तर एक जानेवारीला सुमारे दीड हजार वाहक, चालक तैनात असतील. पेरणे येथे पार्किंगला ३१ डिसेंबरला ११०० तसेच एक जानेवारीला १३०० वाहक- चालक दोन शिफ्टमध्ये काम करतील. एनडीआरएफचे एक पथकही नेमले आहे. जिल्हा व शहर पोलिसांचे आठ हजार कर्मचारी व अधिकारी जबाबदारी सांभाळणार आहेत.
अनुयायी मोठया प्रमाणावर येणार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. गेल्यावर्षी सुमारे १६ लाख अनुयायी आले होते. त्यानुसार ६० एकरांवर १७ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली होती. यंदा वीस लाख अनुयायी येण्याची शक्यता वर्तविली. त्यामुळे सुमारे ४० एकरांने पार्किंग क्षेत्रात वाढ करून दोन्ही बाजूला ११० एकरांवर ३४ वाहनतळ उभारले जाणार आहेत.
सुविधा कोणत्या मिळणार?
* यंदा पाण्याचे टँकर वाढवण्यात आले असून ही संख्या दीडशेने वाढली आहे.
* या ठिकाणी सुमारे दोन हजार शौचालये उभारण्यात आले असून सक्शन मशिन ठेवण्यात येणार आहेत.
* वैद्यकीय विभागाचे सुमारे २५९ अधिकारी व कर्मचारी दोन्ही दिवशी वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहेत.
* आपत्कालीन परिस्थितीत १०८ क्रमांकाच्या २० तर अन्य ३० अशा एकूण ५० रुग्णवाहिका या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत.



