धक्कादायक! पुणे जिल्ह्यात बनावट नोटा तयार करून चालनात आणत होती टोळी!

पुणे : बनावट नोटा तयार करून चलनात आणणाऱ्या आरोपीस रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून आरोपीकडून नोटा तयार करण्याचे साहित्य जप्त केले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत एक व्यक्ती यशइन चौकात बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी संशयित व्यक्तीस सापळा रचून ताब्यात घेतले.
यावेळी आरोपीची झडती घेतली असता आरोपी मनीष अमर पाल (रा. उत्तरप्रदेश) याच्याकडे ५०० रुपयांच्या ६० बनावट नोटा आढळून आल्या. पोलिसांनी अधिक तपास केला मनिष पाल याने बनावट नोटा शिरूर शहरात रामलिंग रोड येथील फ्लॅट मध्ये तयार करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सदरील फ्लॅटमध्ये पाहणी केली असता कलर प्रिंटर स्कॅनर, पांढरे कागद, हिरव्या रंगाची पावडर, छाप्याची लाकडी फ्रेम, वेगवेगळ्या रंगाचे कलर आदी आढळून आले.पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन सर्व साहित्य जप्त केले.
ही कारवाई पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरडे, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस अंमलदार उमेश कुतवळ, विजय शिंदे, विलास आंबेकर, संतोष औटी, अभिमान कोळेकर यांनी केली आहे.



