महाराष्ट्र

झाडां ना डांबर, डेब्रिज- सिमेंटचा फास, झाडांचे मोठे नुकसान

भायंदर :  झाडांच्या बुंध्या संबोवताली एक मीटर बाय एक मीटरचे क्षेत्र मोकळे ठेवणे हरित लवादच्या आदेशा नुसार बंधनकारक असताना देखील मीरा भाईंदर मध्ये एमएमआरडीए आणि महापालिका मार्फत रस्ते – नाले बांधकाम करताना झाडांच्या बुंध्या भोवती सर्रास डांबर, डेब्रिस, सिमेंट आदींचा फास आवळला जात आहे यामुळे झाडांचे मोठे नुकसान होत असून संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासह सेवेतून निलंबित करावे अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केली आहे. मीरा भाईंदर मध्ये सार्वजनिक रस्ते, नाले तसेच अन्य विकासकामे करताना सर्रास लहान- मोठ्या झाडांच्या बुंध्या भोवती डांबरीकरण करणे, काँक्रीटीकरण करणे असले प्रकार सातत्याने केले जातात . झाडांच्या बुंध्या सभोवताली १ मीटर बाय १ मीटर ची जागा मोकळी सोडून त्याला चौकट बांधणे व आतील भागात केवळ माती ठेवणे आवश्यक असते. ज्यामुळे झाडांच्या मुळांना ऑक्सिजन, पाणी मिळते. हरित लवाद ने देखील ह्या बाबत आदेश दिलेले आहेत. परंतु मीरा भाईंदर महापालिकेतील काही मुजोर आणि निगरगट्ट अधिकारी मात्र हरित लवादाच्या आदेशा सह कायदे नियम आदींना न जुमानता झाडांच्या भोवती सर्रास सिमेंट , डांबर , डेब्रिजचा फास आवळत आले आहेत .

या बाबत वृक्ष प्राधिकरण विभागा कडून महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागास अनेकवेळा पत्र दिली आहेत. परंतु बांधकाम विभाग हा प्रशासनातील बलाढ्य मानला जात असल्याने सदर विभागाचे अधिकारी हे लवाद, वृक्ष प्राधिकरण विभाग यांच्या निर्देशांना जुमानत नाही. त्यातच सध्या शहरात सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे सुरु असून या कामा दरम्यान देखील झाडांच्या सभोवताली मोकळी जागा हरित लवादाच्या आदेशा नुसार सोडलेली नाही व तसे आळे देखील बांधलेले नाहीत. झाडांच्या बुंध्यांना डेब्रिज आणि सिमेंट टाकण्यात आले आहे. नुकतेच घोडबंदर किल्ल्यात देखील सुशोभीकरण कामा दरम्यान झाडांच्या बुंध्यांना चक्क काँक्रीटीकरण करण्यात आले होते. परंतु त्या प्रकरणी देखील अजून संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई केली गेलेली नाही. शहरातील नव्याने सुरु असलेले सिमेंट रस्ते , आधी केलेले डांबरी रस्ते , नाले बांधकाम वा पदपथ बांधकाम दरम्यान ज्या ज्या ठिकाणी झाडांना डांबर- काँक्रीटचा फास घालण्यात आला आहे तो तात्काळ काढून घेण्यात यावा. त्याठिकाणी चौकट बसवून माती टाकण्यात यावी. या प्रकरणात हरित लवादाच्या आदेशाचे उल्लंघन करून झाडांना हानी पोहचवणाऱ्या पालिकेचे आणि एमएमआरडीएचे संबंधित अधिकारी,. ठेकेदार यांच्यावर नागरी झाडांचे जतन व संवर्धन आदी कायदे नुसार गुन्हा दाखल करावा. त्यांच्या वेतनातून झाडांचे झालेले नुकसान वसूल करावे. त्यांना सेवेतून निलंबित करावे अशी मागणी गो ग्रीन फाऊंडेशन, सत्यकाम फाउंडेशन , जिद्दी मराठा संस्था आदींच्या पदाधिकारी आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button