महाराष्ट्र

रस्ते खोदकामांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडी प्रकरणी पोलिसांनी दिल्या सूचना

मीरारोड : शासन आणि मीरा भाईंदर महापालिकेच्या माध्यमातून शहरात सिमेंट रस्ते बांधकामे , सूर्या पाणी पुरवठा योजनेची कामे आदींसाठी मोठ्या प्रमाणात रस्ते खोदून ठेवण्यात आले असून त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी व रहदारीला अडथळा तसेच पावसाळ्या आधी कामे पूर्ण करणे या बाबत वाहतूक पोलिसांनी बैठक बोलावून ठेकेदारांना अनेक सूचना केल्या आहेत. राज्य शासनाच्या तसेच महापालिकेच्या मंजूर निधी मधून शहरातील अनेक लहान मोठे रस्त्यांचे काँक्रीटीकरण हाती घेण्यात आले आहे. त्याच बरोबर सूर्या पाणी पुरवठा योजने अंतर्गत शहरातील नवीन मोठ्या जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी सुद्धा रस्ते ठिकठिकाणी खोदले आहेत .

रस्ते मोठ्या प्रमाणात खोदून कामे करताना त्याठिकाणी महापालिका व ठेकेदार यांच्या कडून मात्र रहदारी आणि वाहतुकीला अडथळा होऊ नये तसेच आवश्यक सुरक्षेच्या उपाययोजना प्रभावीपणे केल्या गेलेल्या नाहीत. खोदकाम सुरु आहेत तिकडे रहदारी व वाहतुकीचे नियमन करण्यासाठी वॉर्डन नेमलेले नाहीत. खोदकाम ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना न केल्याने अनेक अपघात होत आहेत. शिवाय तोंडावर पावसाळा आला असून खोदकाम आदी त्या आधी पूर्ण करणे आवश्यक आहे. शहरातील रस्ते खोदकाम मुळे होत असलेल्या वाहतूक कोंडी आणि पावसाळा पाहता मीरा भाईंदर- वसई विरार उपायुक्त मुख्यालय सुहास बावचे यांनी आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीला वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त विलास सानप, पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे सह रस्ते बांधकाम करणारे ठेकेदार व प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

रस्ते खोदकामची कामे ही पावसाळ्या आधी वेळेत पूर्ण करा. उर्वरितकाम हे पावसाळा संपल्यानंतरच सुरु करा. ज्या ठिकाणी कामे चालू आहेत त्या ठिकाणी वाहतूक सुरळीत राहण्यासाठी व नागरिकांना रहदारीला अडथळा येऊ नये म्हणून ट्राफिक वार्डन ठेवा. कामाच्या ठिकाणी बॅरीकेटीग करा. रेडियम पटटी, नाईट ब्लिंकर्स, वाहतूक कोन यांचा वापर करा जेणे करून रात्रीच्या वेळी दुर्घटना होणार नाही आदी सूचना उपायुक्त सुहास बावचे यांनी केल्या आहेत. रहदारी व वाहतुकीला अडथळा होऊ नये तसेच दुर्घटना घडू नये म्हणून आवश्यक उपाययोजना न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देखील पोलिसांनी दिला आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button