राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) प्रमुखपदी नवल बजाज यांची नियुक्ती

मुंबई : गेल्या अडीच महिन्यांपासून रिक्त असलेल्या राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) प्रमुखपदी वरिष्ठ आयपीएस अधिकारी नवल बजाज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदानंद दाते यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाल्याने एटीएस प्रमुख पद रिक्त होते, अखेर बुधवारी (१९ जून) गृहमंत्रालयाने त्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले आहे.
राज्य एटीएसचे प्रमुख सदानंद दाते यांची २७ मार्चला केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर त्यांनी एनआयएच्या प्रमुखपदी सूत्रे हाती घेतली होती. तेव्हापासून राज्य एटीएस पद रिक्त होते. या पदाचा अतिरिक्त कार्यभार विशेष पोलीस महानिरीक्षक सी. के. मीना यांच्याकडे सोपविण्यात आला होता. अखेर बुधवारी राज्य एटीएसच्या प्रमुखपदी नियुक्तीच्या प्रतिक्षेच्या असलेल्या नवल बजाज यांची नियुक्ती केली.
नवल बजाज हे १९९५ ब्रॅचचे अधिकारी असून त्यांनी मुंबई शहरात पोलीस उपायुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, विशेष शाखा अतिरिक्त पोलीस आयुक्त, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, सहपोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था, राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अप्पर पोलीस महासंचालक आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आदी महत्त्वाच्या ठिकाणी काम केले आहे. सीबीआयच्या सहसंचालक म्हणून काम करताना त्यांनी कोळसा घोटाळ्याचा तपास केला होता. त्यानंतर मे महिन्यांत त्यांना पुन्हा मूळ महाराष्ट्र केडरमध्ये पाठविण्यात आले होते. मात्र लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याने ते नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. अखेर बुधवारी त्यांची एटीएस प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


