गोखले- बर्फीवाला उड्डाणपुलाचे आव्हानात्मक काम यशस्वी; १ जुलैपासून होणार पुलावरून वाहतूक सुरू

मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिम यांना जोडणाऱ्या सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग उचलून गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपूलाच्या समांतर पातळीवर जुळवण्यासाठी हायड्रॉलिक जॅक आणि ‘एमएस स्टूल पॅकिंग’चा वापर करून जोडण्याचे अतिशय आव्हानात्मक काम गेल्या दोन महिन्यात मुंबई महापालिकेद्वारे नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. याअंतर्गत बर्फीवाला उड्डाणपूलाचा भाग एका बाजुला १,३९७ मिलीमीटर आणि दुसऱ्या बाजुला ६५० मिमी वर उचलण्यात आला आहे. कॉंंक्रिट क्युरिंगच्या कामानंतर येत्या १ जुलैपासून दोन्ही पुलांवरील वाहतूक सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.
अंधेरी पूर्व आणि पश्चिमेच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा दुवा असलेल्या गोखले उड्डाणपूल आणि बर्फीवाला उड्डाणपूल यांच्या जोडणीसाठीची कामे वेगाने करण्याच्या सूचना मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिल्या होत्या. तसेच ही कामे नियोजित कालावधीत पूर्ण करण्यासाठीच्या सूचना अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिल्या होत्या. त्यानुसार अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ही कामे सुरू आहेत.
दोन्ही पुलांच्या जोडणीसाठी आवश्यक असणाऱ्या स्टिचिंगच्या काँक्रिटीकरणाचे काम झाल्यानंतर त्यापुढे सलग सहा तास पाऊस न पडणे आवश्यक होते. विशेष म्हणजे हे काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरात त्यापुढील १२ तासांपेक्षा अधिक कालावधीदरम्यान पाऊस न पडल्याने काँक्रिटीकरण आणि स्टिचिंगचे काम विना अडथळा करणे शक्य झाले.
बर्फीवाला उड्डाणपूल एका बाजूला १,३९७ मिलीमीटर तर दुसऱ्या बाजुला ६५० मिलीमीटर वरच्या दिशेने उचलण्यासाठी ‘हायड्रॉलिक जॅक’ आणि ‘एमएस स्टूल पॅकिंग’चा वापर करण्यात आला. त्याचबरोबर बर्फीवाला उड्डाणपूलाखाली पेडेस्टल (आधार देणारे खांब) वापरण्यात आले आहेत. एकूण दोन पेडस्टलचा आधार देत जोडणी करावयाचा भाग हा १,३९७ मिमी या उड्डाणपूलाचा गर्डर वर उचलण्यात आला आहे. त्यासोबतच सहा नवीन बेअरींगही त्या साच्यात बसविण्यात आल्या. पेडस्टलला देण्यात आलेले ‘बोल्ट’ हे बर्फीवाला उड्डाणपूलाच्या पिलरशी जुळणे हे अतिशय महत्त्वाचे आव्हान होते. अवघ्या २ मिमि जागेच्या अंतरामध्ये अतिशय अचूकपणे हे दोन्ही पेडेस्टल जुळवण्याचे आव्हान पूल विभागाचे अभियंता आणि सल्लागारांच्या तांत्रिक चमूने अतिशय नियोजनबद्धरीत्या आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने जुळवून आणले. वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हिजेटीआय), आय.आय.टी. आणि स्ट्रक्ट्रॉनिक्स कन्सलटिंग इंजिनिअर्स या तांत्रिक सल्लागारांच्या देखरेखीखाली हे आव्हानात्मक काम पार पाडण्यात आले.
बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोखले उड्डाणपूल यांचे एकमेकांना जोडले जाणारे गर्डर जुळवण्यासाठी काँक्रिटिंगचे काम हे पावसाने उघडीप दिल्याच्या काळात करणे आवश्यक होते. सुदैवाने काम झाल्यानंतर सुमारे सहा तास पाऊस न येणे गरजेचे होते. ही बाब लक्षात घेऊन, सदर सहा तासांच्या काळात पाऊस आल्यास पर्जन्यरोधक शेडची विशेष व्यवस्थाही सदर ठिकाणी करण्यात आली होती. सुदैवाने महापालिकेच्या या कामाला निसर्गानेदेखील साथ दिली, आणि १२ तास साथ दिली नाही.
गोखले पुलाला बर्फीवाला पुलाचा भाग जोडण्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकीनुसार स्टिचिंग आणि काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. याअंतर्गत करण्यात आलेल्या स्टिचिंग दरम्यान दोन्ही ब्रीजची लोखंडी सळई ही तांत्रिक सल्लागाराने सुचवलेल्या संरचनेप्रमाणे ‘वेल्डिंग’ करण्यात आली आहे. याठिकाणी काँक्रिट भरण्याचे काम आता पूर्ण झाले आहे. यानंतर सुमारे १४ दिवसांचा कालावधी हा क्यूरिंगसाठी लागणे अपेक्षित आहे. वेगाने कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण व्हावे यासाठी उच्च दर्जाचे कॉंक्रिट या कामासाठी वापरण्यात आले आहे. या कामानंतर पूलावर २४ तासांच्या कालावधीत ‘लोड टेस्ट’ करण्यात येईल. त्यासोबतचा पुलाच्या जोडणी सांध्याचे कामही लवकरच पूर्ण होणे अपेक्षित आहे. यानंतर पुलांवर वाहतूक सुरू होण्याच्या दृष्टीने आवश्यक ते काम यापूर्वी निर्धारित करण्यात आलेल्या टप्प्यांनुसार करण्यात येईल, असेही पूल विभागाद्वारे कळविण्यात आले आहे.


