महाराष्ट्र

पहिलीच्या ‘बालभारती’ मराठी पाठ्यपुस्तकातील ‘जंगलात ठरली मैफल’ कविता वादात

मुंबई : बालभारतीच्या मराठीच्या पुस्तकातील एक कविता वादग्रस्त ठरली आहे . ज्यामध्ये इंग्रजी शब्दांचा उल्लेख केला आहे. इयत्ता पहिलीच्या पुस्तकातील “जंगलात ठरली मैफल” या कवितेच्या शेवटच्या ओळीत लिहिले आहे “वन्समोअर वन्समोअर झाला शोर!” या इंग्रजी शब्दांच्या वापरामुळे सोशल मिडियापासून सर्वत्र टीका केली जात आहे. राजभाषा सल्लागार समितीनेही या पुस्तकातील भाषेच्या तपासणीची मागणी केली आहे. याच प्रकरणावर शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांची प्रतिक्रिया अंचबित करणारी आहे.

शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी या वादावर अचंबित करणारी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की, एखाद्या लहान गोष्टीचा किती बाऊ करायचा ? याचे भान प्रत्येकानेच बाळगले पाहिजे. वन्समोअर हा शब्द रुढ झाला आहे त्याला पर्याय नाही. मी मराठी भाषेचा मंत्री आहे. मराठी भाषेचे धोरण मीच आणले आहे. प्रत्येक सरकारी कार्यालयात मराठी बोलणे कम्पलसरी केले आहे. त्यावेळी कोणालाही मराठीचा कळवळा आला नाही.

बालभारतीचे इयत्ता पहिलीचे मराठी पुस्तकाची सोशल मिडियावरही चर्चा होत आहे. या पुस्तकामध्ये पूर्वी भावे यांनी लिहिलेली जंगलात ठरली मैफल ही कविता प्रकाशित केली गेली त्यातील जंगलात ठुमकत नाचत आला मोर वन्समोअर वन्समोअर झाला शोर असे लिहिले असल्याने सोशल मिडियावर बालभारतीच्या प्रकाशनावरच आक्षेप घेतले जात आहेत. इंग्रजाळलेली मराठी कविता का घेतली असा सवालही करण्यात येत आहे. राज्यभाषा सल्लागार समीतीचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर आणि बालभारतीचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी सर्व इयत्तांच्या पाठ्यपुस्तकाच्या मराठी भाषेचा वापराबाबत तपासणी करण्याची आणि त्याचा अहवाल सादर करण्याची मागणी केली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button