कर्तव्य चोख बजावल्यानंतरही पोलीस अधिकाऱ्यांवर होतेय कारवाई; पोलीस दलात नाराजीची लाट

पुणे : पुणे, शहर पोलीस दलातील कारभाराची चर्चा दिवसेंदिवस वाढत असून, चोख कर्तव्य बजावल्यानंतर वरिष्ठांनी शाबासकी देण्याऐवजी चक्क एका अधिकाऱ्याला कारवाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. यासर्व प्रकारानंतर मात्र, पोलीस दलात प्रचंड नाराजी पसरली असून, आमच चुकलं काय, अशी बोलकी प्रतिक्रिया उमटू लागली आहे. यासोबत शहर पोलीस दलातील खदखद देखील बोलून दाखवली जाऊ लागली आहे.
अश्याच एका प्रकरणी लोणी काळभोर भागात २४ मे रोजी तरुणाला ८ जणांनी अटकावून लुटले. मारहाण करून त्याच्याकडील रोकड व मोबाइल काढून घेतला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि फरार असलेल्या मुख्य आरोपीला अटक केली. पोलीस निरीक्षकांनी त्याच्यावर कारवाई केली. न्यायालयाने पोलिसांची बाजू ऐकून त्याला कोठडी देखील दिली. आजच (दि ३० जुलै) त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली. मात्र, याप्रकरणात गो-रक्षणाचे काम करणाऱ्या एका माजी नगरसेवकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या व अटक का केली, त्याची अटक बेकायदेशीर आहे, असे म्हणत वरिष्ठ निरीक्षक आणि कारवाई करणाऱ्या निरीक्षकाविरोधात तक्रार केली. त्यानंतर मात्र, संबंधित निरीक्षकांना पोलीस नियत्रंण कक्षासी सलग्न करत कारवाई केली. अतिरिक्त आयुक्तांनी गुन्हा लोणी काळभोर येथून थेट येरवडा पोलिसांकडे तपासाला वर्ग केला. दरम्यान, याप्रकरणात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही.
शहर पोलीस दलात सध्या सर्वच काही आलबेल नसल्याची कुणकूण गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळत आहे. वरिष्ठ निरीक्षकांनी ‘पोलीस ठाणे’ नको म्हणत साईड ब्राँच मागितली. दुसरीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते खालपर्यंत “एकछत्री” कार्यपद्धतीमुळे अंतरठेवून कामे सुरू आहेत. परिणामी नावलौकिक असलेल्या पुणे पोलिसांच्या कामावर देखील परिणाम झाला आहे. फर्ग्युसन रस्त्यावरील त्या ड्रग्ज पार्टीप्रकरणात पोलीस निरीक्षक व सहायक निरीक्षकाचे तडकाफडकी निलंबन झाले. पण याप्रकरणात तडकाफडकी निलंबन व त्या अधिकाऱ्यांचे पुर्व रेकॉर्ड तसेच एकूण प्रकरणानंतर पोलीस दलात या कारवाईने अस्वस्थता निर्माण झाली. गेल्या पाच महिन्यात विविध कारणांनी अनेकांना नियंत्रण कक्ष, मुख्यालय व विशेष शाखेचा रस्ता दाखविला. चूका करणाऱ्यांना आणि त्या अवैध गोष्टींना पाठबळ देणाऱ्यांवर कारवाईला कोणाची हरकत नाही. परंतु, ज्यांचा संबंध नाही असेही अधिकारी आणि कर्मचारी भरडले जाऊ लागले आहेत. “पुर्वी” अवैध धंद्यांना पाठबळ देणाऱ्यांची यादी काढून त्यांना आता मुख्यालयाचा रस्ता दाखवला. हा रस्ता दाखवताना ज्यांचा अशा गोष्टींशी काडीचा संबंध नाही, अशांचीही नावे या यादीत समाविष्ट झाली. त्यामुळे कर्मचारी वर्गात प्रचंड नाराजी आणि भितीही आहे. त्यामुळे काम देखील करण्यास कोणी इच्छुक नाही.
पुण्याची गुन्हे शाखा गेल्या काही वर्षात उत्कृष्ट कारवाईमुळे देश-विदेशात नावारूपाला आली. ड्रग्ज रॅकेट, त्यापुर्वीची पेपर फुटी किंवा मोठ्या गुन्ह्यांचा जलद गतीने तपास व आरोपींची अटक. मात्र, सध्या गुन्हे शाखेत काम करण्यास कोणी इच्छुक नसल्याचे दिसत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांपासून कर्मचाऱ्यांपर्यत कोणीही गुन्हे शाखेत काम करण्यास इच्छुक तर नाहीच पण तिथं नेमणूक नको म्हणत आहेत. त्यामुळे अनेकांना बळजबरीने गुन्हे शाखेत नेमण्याची वेळ वरिष्ठांवर आली आहे.


