महाराष्ट्र

वसई-नालासोपारा आगारात ८ नव्या गाड्यांचा समावेश; प्रवाशांचा प्रवास होणार अधिक सुखकर

विरार : वसई तालुक्यातील एसटी महामंडळाच्या ताफ्यात आठ नव्या बस दाखल झाल्याने प्रवासीवर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. वसई बस आगारात ४० आसनक्षमतेच्या तीन नव्या राजमाता जिजाऊ बस तर नालासोपारा बस आगारात पाच नव्या एसटी बसेस दाखल करण्यात आल्या आहेत. या नव्या बसेसमुळे जिल्ह्यांतर्गत प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि सुलभ होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वसई तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणावर नागरिक दैनंदिन प्रवासासाठी एसटी सेवेवर अवलंबून आहेत. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार तसेच सर्वसामान्य प्रवासी यांची संख्या मोठी आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून अनेक मार्गांवर जुन्या व खिळखिळ्या झालेल्या बसेस धावत असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान वारंवार तांत्रिक बिघाड आणि असुविधांमुळे प्रवाशांची नाराजी वाढली होती. प्रवाशांच्या या अडचणी लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने नव्या बसेसची मागणी केली होती. त्यानुसार वसई आणि नालासोपारा बस आगारांना एकूण आठ नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नालासोपारा बस आगारात दाखल झालेल्या पाच नव्या एसटी बसचे उद्घाटन आमदार राजन नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. तर वसई बस आगारातील तीन नव्या राजमाता जिजाऊ बसचे उद्घाटन शुक्रवारी आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या हस्ते पार पडले. या सर्व बसांचा वापर प्रामुख्याने जिल्ह्यांतर्गत वाहतुकीसाठी केला जाणार असल्याची माहिती बस आगार व्यवस्थापकांनी दिली. दरवर्षी आषाढी, कार्तिकी यात्रा तसेच गणेशोत्सवाच्या काळात पालघर जिल्ह्यातून लांब पल्ल्याच्या विशेष एसटी गाड्या सोडल्या जातात. त्यामुळे स्थानिक मार्गांवरील बससेवेवर ताण येऊन अंतर्गत वाहतुकीत अडथळे निर्माण होतात. नव्या बसेसच्या समावेशामुळे हा ताण कमी होण्यास मदत होणार असून प्रवाशांची गैरसोयही मोठ्या प्रमाणात टळणार आहे. या नव्या समावेशानंतर नालासोपारा बस आगारातील बसांची संख्या ४५ वरून ५० झाली असून वसई बस आगारातील ताफा ४३ वरून ४६ बसांपर्यंत वाढला आहे. त्यामुळे आगामी काळात प्रवाशांना अधिक नियमित, विश्वासार्ह आणि दर्जेदार एसटी सेवा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button