महाराष्ट्रमुंबई

‘ड्रग फ्री मुंबई’साठी समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग आवश्यक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी मुंबईत ‘ड्रग फ्री मुंबई’ या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अमली पदार्थांविरोधातील लढा केवळ पोलीस प्रशासनाचा नसून समाजातील प्रत्येक घटकाने त्यात सक्रिय सहभाग घेतल्याशिवाय ‘ड्रग फ्री मुंबई’ आणि ‘ड्रग फ्री महाराष्ट्र’चे उद्दिष्ट साध्य होणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नशामुक्त भारताचा’ संकल्प केला असून तो पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. भारत हा जगातील सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेला देश असून हीच तरुणाई विकसित भारताची सर्वात मोठी ताकद आहे. योग्य दिशा मिळाल्यास ही युवा पिढी देशाला जगाचे नेतृत्व करण्याच्या उंचीवर नेऊ शकते. भारताला थेट युद्धात पराभूत करणे शक्य नसल्याने देशातील तरुणाईला अमली पदार्थांच्या विळख्यात अडकवून देशाला आतून कमकुवत करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. दुर्दैवाने, पैशाच्या मोहापायी देशातील काही घटकही अशा कारवायांमध्ये सहभागी होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ड्रगविरोधातील ही लढाई पोलीस, आरोग्य, सामाजिक न्याय, शालेय शिक्षण विभाग, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि समाजातील प्रत्येक नागरिकाने सामूहिकपणे लढली पाहिजे. सरकारकडून अमली पदार्थांचा पुरवठा, उत्पादन आणि तस्करीविरोधात कठोर कारवाई सुरू असली तरी समाजाच्या सक्रिय सहभागाशिवाय हे अभियान यशस्वी होणार नाही. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गनिमी काव्याप्रमाणे ड्रग माफियांचे संपूर्ण जाळे उद्ध्वस्त करण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांना ड्रग्जची विक्री, पुरवठा किंवा व्यसनाधीनतेबाबतची माहिती तातडीने प्रशासनाला देण्याचे आवाहन केले. माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल तसेच भविष्यात त्यांचा गौरवही करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. देशाचे भवितव्य घडविणारी युवा पिढी हीच उद्याचे डॉक्टर, अभियंते आणि वैज्ञानिक असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांनी ‘Say No to Drugs’चा संकल्प करून कोणत्याही आमिषाला किंवा दबावाला बळी न पडण्याचे आवाहन केले. शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांनी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले. ड्रगविरोधात सर्वांनी एकजुटीने काम केल्यास येत्या तीन ते चार वर्षांत ‘ड्रग फ्री मुंबई’, ‘ड्रग फ्री महाराष्ट्र’ आणि ‘नशामुक्त भारत’ हे उद्दिष्ट निश्चितच साध्य होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button