देशविदेश

अदानी प्रकरणात गुंतवणूकदारांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयाने SEBI कडे मागितले उत्तर

नवी दिल्ली : हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालाशी संबंधित अदानी समूहाविरुद्धच्या दोन जनहित याचिकांवर (पीआयएल) सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सुनावणी केली. मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा आणि जेबी पार्डीवाला यांच्या खंडपीठाने सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाला (सेबी) गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी भविष्यात काय उपाययोजना करता येतील हे सुचवण्यास सांगितले.

न्यायालयाने सेबीतर्फे हजर असलेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सोमवारी या प्रकरणाची संपूर्ण माहिती देण्यास सांगितले. अधिवक्ता एमएल शर्मा आणि विशाल तिवारी यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकांमध्ये दावा केला आहे की हिंडेनबर्गने शेअर्स शॉर्ट सेल केले. यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. तिवारी म्हणाले की, हिंडेनबर्ग अहवालाने देशाची प्रतिमा डागाळली आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. शर्मा यांच्या याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की या अहवालावरील प्रसारमाध्यमांच्या प्रचाराचा बाजारावर परिणाम झाला आणि हिंडनबर्गचे संस्थापक नॅथन अँडरसन हे देखील भारतीय नियामक सेबीला त्यांच्या दाव्यांचे पुरावे प्रदान करण्यात अयशस्वी ठरले.

याचिकेत मनोहर लाल शर्मा यांनी सेबी आणि केंद्रीय गृहमंत्रालयाला हिंडनबर्ग रिसर्चचे संस्थापक नॅथन अँडरसन आणि भारतातील त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे निर्देश मागितले आहेत. विशाल तिवारी यांनी निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून हिंडेनबर्ग अहवालाची चौकशी करण्याची मागणी केली. तिवारी यांनी आपल्या याचिकेत शेअरच्या किमती घसरल्यानंतर लोकांची काय अवस्था होते हे स्पष्ट केले.

हिंडेनबर्ग रिसर्चने २४ जानेवारी रोजी अदानी समूहाबाबत एक अहवाल प्रकाशित केला. अहवालात मनी लाँड्रिंगपासून शेअर्समध्ये फेरफार करण्यापर्यंतचे आरोप समूहावर करण्यात आले होते. या अहवालानंतर समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. शुक्रवारी म्हणजेच ३ फेब्रुवारी रोजी अदानी एंटरप्रायझेसचा शेअर १००० रुपयांच्या जवळ पोहोचला होता. मात्र, नंतर तो सावरला.

हिंडेनबर्ग रिसर्चच्या दाव्यांच्या विरोधात लढण्यासाठी अदानी समूहाने अमेरिकेतील लॉ फर्म ‘वॉचटेल’ ला नियुक्त केले आहे. खटला लढवून अदानी समूह आपल्या गुंतवणूकदारांना कंपन्यांच्या आर्थिक आरोग्याबद्दल खात्री देऊ इच्छितो. या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांनी सांगितले की, भारतातील सिरिल अमरचंद मंगलदास कंपनीने वॉचटेलशी संपर्क साधला होता.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button