अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ३४ गुन्हे दाखल; होऊ शकते १३६ वर्षांची शिक्षा

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मंगळवारी मॅनहॅटन कोर्टाने ३४ आरोप निश्चित केले आहेत. जर कोर्टाने ट्रम्प यांना आरोपांमध्ये दोषी ठरवले तर त्यांना तब्बल १३६ वर्षांची शिक्षा होऊ शकते. गुन्हेगारी प्रकरणात अटक होणारे ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ डिसेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, न्यायालयाने ट्रम्प यांना १.२२ लाख डॉलरचा दंडही ठोठावला असून हे पैसे पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला दिले जाणार आहेत.
२०१६ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सशी संबंध ठेवल्याचा आणि तिला वाच्यता न करण्यासाठी १ लाख ३० हजार डॉलरची लाच दिल्याचा तसेच व्यावसायिक नोंदीत अफरातफरी केल्याप्रकरणी ट्रम्प यांच्यावर कोर्टात खटला चालवला गेला आहे. ट्रम्प मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास मॅनहॅटन न्यायालयाला शरण आले, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान, ट्रम्प यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळत निर्दोष असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, ट्रम्प यांच्या अटक किंवा जामिनावर मॅनहॅटन कोर्टाने कोणताही निर्णय दिलेला नाही. तब्बल ५७ मिनिटांच्या सुनावणीनंतर १२.३० च्या सुमारास ट्रम्प फ्लोरिडाच्या दिशेने रवाना झाले.
ट्रम्प यांच्यावर ३४ आरोप हे खोटे व्यावसायिक रेकॉर्ड दाखवल्याप्रकरणी आहेत. हे प्रकरण २०१६ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला कुठेही वाच्यता न करण्यासाठी १ लाख ३० हजार डॉलरची लाच देऊ केल्याशी संबंधित आहे. ११ आरोप चेकवरील स्वाक्षरी प्रकरणी तर अन्य ११ आरोप ट्रम्प यांचे वकील कोहेन यांच्या कंपनीत चुकीच्या पद्धतीने बिले सादर केल्याप्रकरणी आहेत. अन्य १२ आरोप बिलाच्या आकडय़ांमधील हेराफेरीशी संबंधित आहेत.
- ९ मेपर्यंत – आरोपांशी संबंधित पुरावे सादर करू शकतात.
- ८ जूनपर्यंत – ट्रम्प आपल्या बचावासाठी पुरावे सादर करू शकतात.
- ८ ऑगस्टपर्यंत – ट्रम्प यांची टीम खटला रद्द करण्यासाठी अर्ज दाखल करू शकते.
- १९ सप्टेंबरपर्यंत – हा खटला रद्द होऊ नये म्हणून विरोधी पक्ष बाजू मांडणार.
- ४ डिसेंबर – सर्व आरोपांवर न्यायाधीश मर्चेन निकाल देतील, यादिवशी ट्रम्प कोर्टात हजर राहतील.
सुनावणीनंतर ट्रम्प घरी पोहोचले. तिथे त्यांनी मीडिया आणि आपल्या समर्थकांसमोर भाषण केले. मी कधीच विचार केला नव्हता की अमेरिकेच्या इतिहासात असे काही घडेल. मी एकच गुन्हा केला आहे तो म्हणजे, मी निर्भयपणे देशाला विनाशापासून वाचवले. पुढे ते म्हणाले, आपला देश नरकात जातोय, जग आपल्यावर हसतंय. माझ्याविरोधात कोणतेही सबळ पुरावे नाहीत. या प्रकरणाची सुनावणी करणारे न्यायाधीश आणि त्यांचे कुटुंबीय माझा तिरस्कार करतात. न्यायाधीशांची मुलगी कमला हॅरिस यांच्यासाठी काम करते. बायडेन-हॅरिस यांच्याकडून त्यांना आता पैसे मिळत आहेत, असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.



