बाळासाहेब देसाईंच्याप्रभावामुळे लवकरच क्रांतीकारी निर्णय घेणार – अध्यक्ष राहूल नॉर्वेकर

मुंबई : ज्या प्रमाणे बाळासाहेब देसाईं यांनी राजकीय आयुष्यात क्रांतीकारी निर्णय घेतले, त्यातून बरेचसे शिकून कदाचित मी सुध्दा लवकरच क्रांतीकारी निर्णय घेईन असे सुतोवाच विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहूल नॉर्वेकर यांनी एका प्रकाशन सोहळ्यात केले.
सर्वोच्च न्यायलयाने राज्यातील सत्तासंघर्षावर निर्णय देऊन आता जवळपास एक महिना झाला. न्यायालयाच्या निकाला प्रमाणे आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांनाच असल्याचं मान्य करण्यात आले. त्यामुळे यासंदर्भात आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरच निर्णय घेणार हे स्पष्ट झालेलं आहे. वाजवी वेळेत हा निर्णय घ्यावा, असंही निकालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता राहुल नार्वेकर नेमका काय, कधी आणि कोणत्या आधारावर निर्णय घेतात? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना त्यांनी स्फोटक विधान केल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
विधानसभा अध्यक्ष राहूल नॉर्वेकरांचे विधान ऐकताच भर कार्यक्रमात गिरीश महाजनांनी तर डोक्यालाच हात लावला!
विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राज्य सरकारमध्ये अनेक मंत्रीपदं भूषवलेले दिवंगत बाळासाहेब देसाई यांचा चरित्रग्रंथ ‘दौलत’ चा बुधवारी प्रकाशन सोहळा पार पडला. या सोहळ्याला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित होते. यावेळी समोर सत्ताधारी पक्षांचे अनेक आमदार-मंत्रीही बसले होते. यावेळी आपल्या भाषणात राहुल नार्वेकरांनी लवकरच क्रांतीकारी निर्णय घेणार असल्याचे सूतोवाच केल्यामुळे उपस्थितांमध्ये कुजबूज सुरू झाली.
राहुल नार्वेकरांनी यावेळी बाळासाहेब देसाई यांच्या कार्याचा गौरव केला. “ज्या ज्या खात्यात बाळासाहेब देसाई यांनी काम केले, त्या त्या खात्यात क्रांतीकारी काम करून त्यांनी निश्चितपणे आपला वेगळा ठसा राज्यात आपल्या सर्वांसमोर मांडला. माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची त्यांच्याकडे सोपवलेली जबाबदारी म्हणजे १९७७-७८ या काळात विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं काम”, असा उल्लेख राहुल नार्वेकर यांनी यावेळी केला.
पुढे म्हणाले की “सातत्याने माझा उल्लेख सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष म्हणून झाल्यामुळे माझे वय सगळ्यांनाच माहिती असेल. ७७ साली माझा जन्म झाला आणि त्याच वर्षी बाळासाहेब देसाईंवर विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी आली. ज्या प्रमाणे त्यांनी राजकीय आयुष्यात क्रांतीकारी निर्णय घेतले, त्यातून बरेचसे शिकून कदाचित मीही लवकरच क्रांतीकारी निर्णय घेईन”, असे सूतोवाच राहुल नार्वेकरांनी दिले. यावर समोरच्या श्रोत्यांच्या प्रतिक्रिया पाहून नार्वेकरांनी लागलीच ” चिंता करायची गरज नाही. निर्णय काय असेल ते सांगितलेलं नाही”, असे म्हणत बाजू सांभाळून घेतली. त्यावर गिरीश महाजनांनी बसल्या बसल्याच ‘मेरिटवर निर्णय’ असे हसत म्हणताच नार्वेकरांनी त्याला दुजोरा देत “मेरिटवर निर्णय घेईन”, असे सांगून टाकले. त्यामुळे श्रोत्यांचा जीव भांड्यात पडला.



