आरे कॉलनी परिसरात रिक्षामध्ये तरुणीवर जबरदस्ती करत बलात्कार

मुंबई गुन्हे वार्ता : राज्यात महिला सुरक्षिततेच्या प्रश्नावर बोट उठवणा-या घटनांचे प्रमाण वाढले असून दर दिवशी दोन ते तीन किंवा त्याहून जास्त धक्कादायक घटना समोर येत आहेत. मुंबईसारख्या वर्दळीच्या ठिकाणीही महिला सुरक्षित नसल्याची प्रचिती येत आहे. तर काही घटनांची भीतीपोटी महिला कुठेही वाच्यता करत नसल्याने त्या तशाच दबून राहत महिलांना अन्याय सहन करावा लागत आहे. अशीच एक दबून राहिलेली धक्कादायक घटना समोर आल्याने मुंबईत पुन्हा खळबळ उडाली आहे. गोरेगाव आरे कॉलनी परिसरात २० वर्षीय महिलेवर रिक्षातच नराधमाने जबरदस्ती करत बलात्कार केला व तो फरार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पीडित महिलेने आपल्यावर झालेल्या अत्याचाराबाबत भीतीपोटी घरच्यांपासून लपवून ठेवले. मात्र काही दिवसांनंतर त्रास सुरु झाल्याने डॉक्टरांनी विश्वासात घेतले असता तिने झालेल्या प्रकाराबद्दल वाच्यता केली. पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेऊन आरोपीविरोधात भारतीय दंड विधान कलम ३७६ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० वर्षीय पीडित तरुणी सीबीडी बेलापूर येथे तिच्या मावशीच्या घरी गेली होती. तिथून घरी परतण्यासाठी तिने नवी मुंबई ते गोरेगाव रिक्षा बुक केली. रिक्षा आरे कॉलनीत पोहचली, त्यावेळी रिक्षा चालकाने रिक्षा एका निर्जन स्थळी नेली. तिथे त्याने आधी तरुणीला मारहाण केली आणि तिच्यावर जबरदस्ती करत बलात्कार केला. त्यानंतर नराधमानं महिलेला घडलेल्या घटनेबाबत कुठेच वाच्यता न करण्याबाबत धमकावलं आणि घटनास्थळावरुन पळ काढला. त्यानंतर त्यानं थेट उत्तर प्रदेश गाठलं.
काही महिन्यांपूर्वी पीडित तरुणीची प्रसूती झाली होती. काही दिवसांनी महिलेला रक्तस्त्राव होऊ लागला. पण भीतीपोटी तिने झालेल्या प्रकाराबाबत घरच्यांना काहीच सांगितले नाही. कुटुंबियांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेत महिलेच्या सर्व चाचण्या करुन घेतल्या. त्यावेळी डॉक्टरांना तपासणी दरम्यान महिलेच्या शरीरावर काही संशयास्पद जखमा आढळून आल्याने त्यांनी महिलेला विश्वासात घेऊन तिची चौकशी केली. त्यानंतर महिलेनं तिच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत डॉक्टरांना आणि कुटुंबियांना माहिती दिली. कुटुंबियांनी तात्काळ जवळचं पोलीस स्थानक गाठलं आणि गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी गुन्हा दाखल करत घटनेची पीडितेकडून संपूर्ण माहिती घेऊन तात्काळ आरोपीचा शोध सुरू केला. सर्वात आधी पोलिसांनी रिक्षाच्या मालकाला गाठलं. मात्र घटनेच्या दुसऱ्या दिवशीच चालक फरार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सर्व माहिती घेऊन आरोपीला उत्तर प्रदेशात बेड्या ठोकल्या. काल रविवारी आरोपीला अटक करुन उत्तर प्रदेशातून मुंबईत आणण्यात आलं. तसेच, इंद्रजित सिंह असं आरोपीचं नाव असून तो उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. तो मुंबईत रिक्षा चालवत असे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


