मुंबई

अदानी हटाव धारावी बचाव; ऑगस्ट क्रांती दिनी हजारो धारावीकर उतरणार रस्त्यावर

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाकडे देण्यात आला असून लवकरच पुनर्विकासास सुरुवात होण्याची शक्यता आहे. असे असताना धारावीकरांनी मात्र अदानी समूहाच्या माध्यमातून धारावीचा पुनर्विकास करण्यास विरोध केला आहे. अदानी हटाव धारावी बचाव अशी हाक देत अदानीकडे हा प्रकल्प देऊ नये अशी मागणी आता धारावी बचाव आंदोलनाने केली आहे. ही मागणी राज्य सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी ऑगस्ट क्रांती दिनी, ९ ऑगस्टला हजारो धारावीकर रस्त्यावर उतरणार आहेत.

धारावी पुनर्विकासाचे घोंगडे मागील १९ वर्षांपासून भिजते आहे. पण आता मात्र राज्य सरकारने हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अदानी समूहाकडे प्रकल्प देण्यास नुकतीच राज्य सरकारने मान्यता दिली आहे. आता लवकरच स्वीकृतीपत्र जारी करत कामास सुरुवात होण्याची शक्यता आहे. १९ वर्षांनी प्रत्यक्ष पुनर्विकास मार्गी लागणार असताना धारावीकर मात्र नाराज आहेत. अदानी समूहाकडे पुनर्विकास प्रकल्प देण्यास धारावीकरांचा विरोध आहे.

अदानीकडून धारावी प्रकल्प योग्य प्रकारे राबविला जाणार नाही असा आरोप धारावी बचाव आंदोलनाने केला आहे. धारावीकर धारावीतून बाहेर फेकला जाईल अशी भीती व्यक्त करत अदानी हटाव धारावी बचाव अशी हाक दिली आहे. हा प्रकल्प अदानीकडून काढण्यात यावा या मागणीसाठी आता धारावीकरांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ९ ऑगस्टला ९० फूट रस्ता येथे मोठ्या संख्येने धारावीकर जमणार असून तेथे अदानीविरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती धारावी बचाव आंदोलनाने दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button