आजही मुसळधार पाऊस; सखल भाग जलमय, रेल्वे, रस्ते वाहतूक विस्कळीत

मुंबई : गेले तीन – चार दिवस मुंबई शहर, उपनगरांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यातच हवामान खात्याने शुक्रवारी मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार मुंबई शहर, तसेच उपनगरांत शुक्रवारी दुपारी १२ नंतर पावसाचा जोर वाढला. मुंबईतील कुर्ला, चेंबूर, विक्रोळी, अंधेरी परिसरात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे सखलभाग जलमय झाले आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. त्याचबरोबर हार्बर मार्गावरही पाणी साचल्याने काही काळ लोकलचा खोळंबा झाला.
राज्यातील अनेक भागांत गेल्या तीन – चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईत शुक्रवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते, तसेच रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. शुक्रवारी दुपारी १ ते २ च्या दरम्यान कुर्ला येथे पाऊस पडला. या एका तासात कुर्ला येथे ३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे कुर्ला येथे हार्बर मार्गावर पाणी साचले.
पश्चिम द्रुतगती मार्गावर वांद्रे येथे पाणी साचले. त्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. दादर पूर्व भागातही पाणी साचले. ‘अंधेरी सब वे’ही जलमय झाला होता. मुसळधार पावसामुळे मुंबईतील शीव, चेंबूर, हिंदूमाता आदी परिसर जलमय झाले आणि या भागातून जाणाऱ्या बेस्टच्या गाडय़ा अन्य मार्गाने वळवाव्या लागल्या. तसेच शीव येथील सखलभागात पाणी साचल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. दरम्यान, हिंदूमाता, अंधेरी सब वे, डॉकयार्ड जंक्शन, दादर टी.टी, माटुंगा आणि महालक्ष्मी या भागात अर्धा ते एक फूट पाणी साचल्याने तेथील वाहतूक विस्कळीत झाली. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सकाळी ८ ते सायंकाळी ५.३० या कालावधीत ९२.२ मिलिमीटर, तर, सांताक्रूझ केंद्रात ११५.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.



