ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर काळाच्या पडद्याआड; ८८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी नेहमीच प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले होते. नुकतीच ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत त्यांनी कांचन यांच्या भावाची भूमिका साकारली होती. त्यांच्या निधनामुळे अवघ्या मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांनी पडद्यावर साकारलेल्या प्रेमळ सासरे ते जीव लावणारे बाबा अशा वडिलधाऱ्या भूमिका खूप गाजल्या.
‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘कथा नव्या संसाराची’, ‘बदफैली’, ‘वरचा मजला रिकामा’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’ अशा एकापेक्षा एक सरस नाटकांमधील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. तर, ‘वाहिनीची माया,’ ‘पैसा पैसा’, ‘आराम हराम है’ आदी चित्रपट आणि ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’, ‘अरे वेड्या मना’, ‘अस्मिता’ अशा गाजलेल्या मालिकांमधूनही त्यांनी भूमिका केल्या होत्या. चित्रपट किंवा नाटकांमधील त्यांच्या छोट्या मात्र महत्वाच्या भूमिकाही संस्मरणीय ठरल्या. अभिनयाच्या माध्यमातून त्यांचा चेहरा मराठी रसिकांच्या घराघरांमध्ये पोहोचला.
जयंत सावरकर यांनी वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी आपल्या नाट्य कारकिर्दीची सुरुवात केली होती. अभिनयाच्या भूकेपोटी त्यांनी अंगावर पडतील ती काम करण्याचा निर्णय घेतला होता. कारकीर्दीच्या सुरुवातीला बरीच वर्षे ते बॅक स्टेज आर्टिस्ट म्हणून काम करत होते. याच काळात ते उदरनिर्वाहासाठी नोकरी देखील करायचे. नंतर त्यांनी हौशी नाट्यसंस्थांमधून छोटीमोठी कामे केली. हळूहळू त्यांचा नाट्यक्षेत्रात जम बसला. ‘एकच प्याला’तील तळीराम, ‘तुझे आहे तुजपाशी’मधील आचार्य, ‘व्यक्ती आणि वल्ली’तील अंतू बर्वा आणि हरितात्या या भूमिका त्यांनी चांगल्याच गाजवल्या होत्या.



