महानगरपालिकेची पाच कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई; साडेसहा कोटी रुपये दंड
चा बडगाच; खड्डे न बुजवल्यामुळे

मुंबई : मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सहा हजार कोटी रुपयांची कामे कंत्राटदारांना देण्यात आली आहेत. मात्र या कंत्राटदारांनी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची जबाबदारी न घेतल्यामुळे त्यांच्यावर महानगरपालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. या पाच कंत्राटदारांना एकूण साडेसहा कोटी रुपये दंड करण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वीही रस्त्यांच्या कामांना सुरुवात न केल्यामुळे याच कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती.
पुढील दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा संकल्प सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाला सर्व रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्याचे निर्देश दिले होते. मुंबई महानगरपालिकेने ३९७ किमी लांबीच्या रस्त्यांच्या कामासाठी ६,०७८ कोटी रुपयांच्या निविदा मागवल्या होत्या. निविदा प्रक्रियेअंती या कामासाठी पाच नामांकित कंत्राटदारांची निवड करण्यात आली व जानेवारी महिन्यात कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले. नव्याने काम दिलेले हे रस्ते प्रकल्प रस्ते म्हणून पालिकेच्या परिभाषेत ओळखले जातात. या रस्त्यांची संपूर्ण जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची असते. त्यामुळे कार्यादेश मिळाल्यानंतर संबंधित रस्त्यांवर पडणारे खड्डे बुजविण्याची जबाबदारी याच कंत्राटदारांची होती. मात्र या कंत्राटदारांनी प्रकल्प रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास नकार दिला होता. ज्या रस्त्यांची कामे अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत. महानगरपालिका प्रशासनाने या कंत्राटदारांना लेखी सूचना केली होती. तसेच प्रकल्प रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. त्यानुसार महानगरपालिका प्रशासनाने कारवाई केली असून या कंत्राटदारांना ६ कोटी ४ लाख रुपये दंड केला आहे. अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी याला दुजोरा दिला आहे.
या पाच कंत्राटदारांना एप्रिल महिन्यातही दंड करण्यात आला होता. कार्यादेश दिल्यानंतरही काही कंत्राटदारांनी कामाला सुरुवात न केल्यामुळे ही दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. पाचपैकी तीन कंत्राटदारांना १६ कोटी रुपये दंड करण्यात आला होता. हे कंत्राटदार शहर आणि पश्चिम उपनगरातील रस्त्यांची कामे करीत आहेत. आता पाचही कंत्राटदारांना दंड करण्यात आला आहे.
एकूण सुमारे ९०० रस्त्यांच्या कामांसाठी कंत्राट देण्यात आले होते. त्यापैकी केवळ ४५ रस्त्यांची कामे सुरू होऊ शकली. आजघडीला ती कामे अर्धवट अवस्थेत आहेत.



