एपीएमसी मार्केटमधून टोमॅटो चोरणाऱ्याला अटक, सतराशे वीस रुपयांची रोकड जप्त

नवी मुंबई : नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीतून टोमॅटो चोरी करणाऱ्या एका चोराला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. मात्र तोपर्यंत त्याने टोमॅटो विकले असून त्याच्याकडून सतराशे वीस रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
ऋषी तुरा असे अटक आरोपीचे नाव आहे. किरकोळ बाजारात १५ ते २० रुपये किलो मिळणाऱ्या टोमॅटोचे दर १५० रुपये प्रति किलो झाले, तर उत्तम दर्जाच्या टोमॅटोचे दर प्रतिकिलो १७० रुपये किलोपर्यंत गेले आहे. त्यामुळे एपीएमसीमधून टोमॅटो चोरी होत होती. या चोरीत वाढ होत असल्याने व्यापाऱ्यांनी सीसीटीव्ही तपासणी सुरू केली असता १२ जुलैला अपरात्री भाजी मार्केट गाळा क्रमांक ५८३ समोरून चार कॅरेट टोमॅटो चोरी करत असताना चोरटे दिसले होते. त्यांना पकडण्यात आले, मात्र दोन्ही चोर नजर चुकवून पळून गेले होते. याबाबत एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
प्रत्येक कॅरेटमध्ये २५ किलो या प्रमाणे १०० किलो टोमॅटोची चोरी झाली होती. ज्याचे मूल्य घाऊक बाजारात १० हजार रुपये होते. या प्रकरणी तपास करीत असताना यातील ऋषी हा एपीएमसी भागातच असल्याची माहिती मिळताच त्याला सापळा रचून अटक करण्यात आली. त्याने चोरी केलेले टोमॅटो विकून टाकले असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडे आढळून आलेले सतराशे वीस रुपये जप्त केले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक तन्वीर शेख यांनी दिली.



