मुंबई

मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात लवकरच दोन यंत्रमानव होणार सामील

मुंबई : मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात लवकरच आणखी दोन यंत्रमानव (फायर रोबो) दाखल होणार आहेत. अत्यंत धोकादायक ठिकाणी जिथे मनुष्य पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी ‘रिमोट कंट्रोल’ने या यंत्रमानवाच्या साहाय्याने आग विझवण्याचे काम करता येणार आहे. त्यासाठी महापालिका साडेसात कोटी खर्च करणार आहे. या यंत्रमानवांचा वापर पूर्व आणि पश्चिम उपनगरात करण्यात येणार आहे.

मुंबई शहराची झपाटय़ाने वाढ होते आहे. मोठय़ा प्रमाणावर मॉल, चित्रपटगृहे, उत्तुंग इमारती बांधल्या जात आहेत. या इमारतींमध्ये तळघरात बहुमजली वाहनतळ बांधले जातात. मात्र, अशा ठिकाणी आग लागल्यास तळघरात साठलेल्या धुरामुळे अग्निशमन जवानांना आग विझवण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतो. तसेच मुंबईतील पेट्रोकेमिकल कारखाने, अणू ऊर्जा संशोधन केंद्र याठिकाणी आगीच्या दुर्घटना घडल्यास अशा ठिकाणी यंत्रमानवाद्वारे पाणी फवारण्याचे काम करता येते. तसेच जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये आग लागल्यास किंवा सागरी किनारा मार्ग व मेट्रोच्या बोगद्यांमध्ये आग लागल्यास तिथेही त्यांचा वापर होणार आहे.

अंधेरी एमआयडीसीत १ जून रोजी एका इमारतीच्या तळघरात आग लागली होती. त्यावेळी पाण्याचा मारा करण्यासाठी जागाच नसल्यामुळे भिंतीला भगदाड पाडून त्यातून पाण्याचा मारा केला होता. पाण्याचा मारा केल्यानंतर धूर आणि गरम वाफाही बाहेर फेकल्या जात होत्या. त्यामुळे आग विझवण्यात अडचणी येत होत्या. अशा ठिकाणी या यंत्रांचा सहाय्याने अग्निशमनाचे काम केले जाणार आहे.

मुंबईत दरवर्षी जवळपास १७ हजार विविध दुर्घटना घडतात व त्याठिकाणी जाऊन अग्निशमन दल बचावकार्य करत असते. यापैकी सुमारे ५००० दुर्घटना या आगीशी संबंधित असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button