पिंपरी-चिंचवडमध्ये यावर्षी सर्वाधिक २२६ गुन्हेगारांवर ‘मोक्का’

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तीन टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे. पिंपरी, तळेगांव दाभाडे, भोसरीतील तीन टोळ्यांतील १६ आरोपींवर कारवाई करण्यात आली.दरम्यान, गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत २०२३ मध्ये आतापर्यंत २२६ गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशाने ही कारवाई केली.पिंपरीतील टोळी प्रमुख यशवंत उर्फ अतुल सुभाष डोंगरे याच्यासह आठ जण, तळेगाव दाभाडे येथील टोळी प्रमुख सुधीर अनिल परदेशी याच्या टोळीतील चार जण आणि भोसरीतील टोळी प्रमुख सौरभ संतुराम मोतीरावे याच्यासह चार जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
या टोळींतील आरोपींच्या विरोधात पिंपरी, चाकण, तळेगाव दाभाडे, भोसरी, कोपरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी, पुरावा नष्ट करणे, दुखापत करणे, घरात घुसून मारहाण करणे, वाहनांची तोडफोड, जाळपोळ करणे असे विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत.दरम्यान, शहरातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ‘मोक्का पॅटर्न’ राबविला आहे. या वर्षी आतापर्यंत २४ टोळ्यांतील २२६ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त स्थापन झाल्यापासून यावर्षी सर्वाधिक गुन्हेगारांवर ‘मोक्क’अंतर्गत कारवाई करण्यात आली.
वर्ष आणि ‘मोक्का’अंतर्गत कारवाई झालेले गुन्हेगार : २०१८ – (८), २०१९ – (५९), , २०२० – (५०), २०२१- (१८७), २०२२ -(१२९), २०२३- (२२६)



