महाराष्ट्र

पुणे जिल्हा परिषदेत होणार १००० पदांची भरती; उद्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू

पुणे : गेल्या चार वर्षांपासून चर्चेत असलेल्या पुणे जिल्हा परिषद भरतीप्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. पुणे जिल्हा परिषदेत गट क संवर्गातील २१ पदांच्या एक हजार जागांसाठी सरळ सेवा भरतीप्रक्रिया राबवण्यात येणार असून, त्यासाठीची अर्ज प्रक्रिया उद्यापासून (५ ऑगस्ट) सुरू होणार आहे. जिल्हा परिषदेतील सरळ सेवा भरतीची सविस्तर माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग) राहुल गावडे यांनी दिली.

यापूर्वी २०१९मध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र ही भरतीप्रक्रिया स्थगित करण्यात आली. त्यामुळे हजारो उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी होती. आता पुन्हा भरतीप्रक्रिया सुरू होत असल्याने उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. राज्य शासनाने मान्यता दिल्यानंतर राज्यभरात एकूण २० जागांसाठी प्रत्येक जिल्हा परिषदेत सरळ सेवा भरती होत आहे. सर्वाधिक पदभरती नाशिक जिल्हा परिषदेत १ हजार ३८ आणि त्या खालोखाल पुणे जिल्हा परिषदेत एक हजार जागांसाठी होणार आहे.

पदभरती प्रक्रिया ‘आयबीपीएस’ संस्थेमार्फत होणार आहे. त्यासाठी अर्ज करण्यासाठी ५ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट अशी मुदत देण्यात आली आहे. भरतीप्रक्रियेबाबत पुणे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर माहिती देण्यात आली आहे. अर्ज भरल्यानंतर पात्र उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा होणार आहे. त्यानंतर मुलाखतीतून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. उमेदवारांनी एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून अर्ज करता येणार नाही. असे अर्ज बाद ठरवले जातील. मात्र वेगवेगळ्या पदासाठी स्वतंत्रपणे अर्ज करण्याची मुभा आहे. https:ibpsonline.ibps.in/zpvpiun23/ या दुव्याद्वारे विद्यार्थ्यांना अर्ज भरता येईल.

यापूर्वी २०१९ मध्ये जिल्हा परिषदेच्या विविध पदांच्या भरतीसाठी ६० हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. मात्र ही परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे अर्जासोबत भरलेली शुल्काची रक्कम उमेदवारांना परत केली जाणार आहे. तसेच संबंधित उमेदवारांना वयामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. मात्र या उमेदवारांना आताच्या परीक्षेसाठी स्वतंत्रपणे अर्ज करणे आवश्यक असल्याचे गावडे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button