महाराष्ट्र

ठाणे शहराचा विकास हाच माझा ध्यास आहे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : ठाणे शहराचा सर्वांगीण कायापालट होत आहे. येत्या काळात आपणा सर्वांना स्वच्छ, सुंदर, विकसित ठाणे शहर आणि जिल्हा पाहायला मिळेल. ठाणे शहराचा विकास हाच माझा ध्यास आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना केले.

ठाणे महापालिका आणि ठाणे दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शन व पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, माजी महापौर नरेश म्हस्के, ठाणे दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्यासह पदाधिकारी, पारितोषिक विजेते छायाचित्रकार तसेच नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमात राष्ट्रीय स्तरावरील छायाचित्र स्पर्धेतील विजेत्या छायाचित्रकारांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

ठाणे शहराचाही सर्वांगीण कायापालट होत आहे. येत्या काळात आपणा सर्वांना स्वच्छ, सुंदर, विकसित ठाणे शहर आणि जिल्हा पाहायला मिळेल. दोन ते तीन वर्षांपूर्वी ठाण्यातून परदेशात वास्तव्यास गेलेला व्यक्ती आता ठाण्यात आला तर त्याला बदललेले ठाणे पाहून विश्वास बसणार नाही. ठाण्यात सुशोभीकरण सुरू आहे. ठाणे लवकरच खड्डेमुक्त करणार आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

एखाद्या कलाकाराकडे कितीही प्रतिभा असली तरी त्याला संधी मिळणे महत्त्वाचे असते. हे शासन कलाकारांना संधी देणारे आणि त्यांचा सन्मान करणारे असल्याचेही शिंदे म्हणाले. छायाचित्रण ही कला नक्कीच सोपी नाही, यासाठी वेगळी दृष्टी लागते, प्रचंड मेहनत घ्यावी लागते. या मेहनतीला न्याय देण्याचे काम हे शासन नक्कीच करेल. महाराष्ट्र राज्य हे सर्वांना सामावून घेणारे राज्य असल्याचे ते म्हणाले. पारंपारिक गोष्टींना आता आधुनिकतेची जोड देणे, ही काळाची गरज आहे. हे शासन पायाभूत सुविधा प्रकल्प मोठ्या प्रमाणात उभे करीत आहे. विकासाला प्राधान्य देत आहे. मात्र हे करीत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याचीही कटाक्षाने काळजी घेतली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

काहीजण हेलिकॉप्टरमधून ‘एरिअल’ छायाचित्र घेतात. पण येथील छायाचित्रकारांनी हेलिकॉप्टरमधून नाही तरी इमारतींवरून उत्तम छायाचित्र टिपले, असे सांगत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर टिका केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button