लोकसभा निवडणुकीबाबत मनसेची बैठक; अमित ठाकरे सादर करणार पुण्याचा अहवाल

पुणे : देशात अवघ्या काही महिन्यांत लोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशभरातील सर्वच पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. एकीकडे इंडिया आघाडी आणि एनडीए या दोन्हीही मोठ्या आघाड्या बैठका घेत आहेत. तर दुसरीकडे देशभरातील प्रादेशिक पक्ष देखील लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात पक्षाची २ ऑक्टोबर रोजी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत २० लोकसभा मतदारसंघांची चर्चा होणार आहे. राज ठाकरे यांनी २० लोकसभा मतदारसंघांसाठी २० निरीक्षक नेमले होते. हे निरीक्षक आता २ तारखेला आपला अहवाल सादर करणार आहेत. सदर बैठकीत राज ठाकरे अहवाल पाहून पुढचा निर्णय घेणार आहेत. यामध्ये मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर पुणे लोकसभा मतदारसंघाचा निरीक्षक म्हणून जबाबदारी होती. ते देखील या बैठकीत आपला अहवाल सादर करणार आहेत. नुकतीच अमित ठाकरे यांनी पुण्यामध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली होती. पुणे लोकसभा मतदारसंघातून मनसेचे कोणते नेते इच्छुक आहेत, याबाबत देखील अमित ठाकरे यांनी चाचपणी केली होती. हा सर्व अहवाल अमित ठाकरे २ तारखेच्या बैठकीत राज ठाकरे यांच्यासमोर ठेवणार आहेत.
२० लोकसभा मतदारसंघातील निरीक्षकांकडून येणाऱ्या अहवालानंतर राज ठाकरे पुढील रणनीती ठरवणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत अहवाल पाहिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जाणार आहे, या संदर्भात चर्चा होऊन राज ठाकरे निर्णय घेणार आहेत. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभेच्या जागेवर मनसेकडून माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी दावा ठोकला आहे. आपल्याला संधी दिली तर मनसेचा पहिला खासदार हा पुण्यातून असेल असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी केले होते. यासंदर्भात लोकदरबार भरवून जनतेचे प्रश्न सोडवण्याचा धडाका मोरेंनी सुरु केला आहे. त्यामुळे मोरेंनी लोकसभेची तयारी सुरू केल्याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात आहे.



