रुग्णसेवेच्या नावाखाली डॉक्टरांनी मांडलाय खेळ; केईएमला ५३ केमिस्ट आणि २६ पॅथॉलॉजी लॅबचा विळखा

मुंबई : औषधांअभावी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात ३५ रुग्ण दगावल्याने अवघा महाराष्ट्र हादरला असतानाच परळच्या केईएम रुग्णालयातील औषध साठा आणि चाचण्यांबाबतही अनेक तक्रारी समोर येत आहेत. रुग्णसेवेच्या नावाखाली येथे डॉक्टरांनी बाजार मांडला असल्याचा रुग्णांच्या नातेवाईकांचा आरोप आहे. केईएमला तब्बल ५३ केमिस्ट दुकाने आणि २६ पॅथॉलॉजी लॅबचा विळखा पडला आहे. रुग्णालयात औषधांची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असून चाचण्याही घटवण्यात आल्या आहेत. बहुतेक औषधे बाहेरून आणण्यास तसेच चाचण्या इतरत्र करण्यास रुग्णांना भाग पाडले जात आहे. यात महापालिका आधिकारी, डॉक्टर आणि केमिस्ट यांचे साटेलोटे असल्याचा आरोप काही नातेवाईकांनी केला.
पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात राज्याच्या कानाकोपऱयातून दररोज हजारो रुग्ण येतात. या ठिकाणी मोफत आणि माफक दरात चाचण्या आणि उपचार होतील या अपेक्षेमुळे गोरगरीब रुग्णांची मोठी गर्दी होते, मात्र रुग्णालयात बहुतेक औषधे मिळत नसल्याची नेहमीचीच ओरड आहे. डॉक्टरांकडून औषधे लिहून दिली जातात ती रुग्णालयातील औषध भांडारात उपलब्ध नसतात. त्यामुळे या औषधांसाठी बाहेरचे केमिस्ट दुकान गाठावे लागते. खासगी मेडिकलमधून हजारो रुपये खर्च करून ही औषधे खरेदी करावी लागत आहेत.
चाचण्यांबाबतही हीच अवस्था आहे. एमआरआय, सीटीस्पॅन, थायरॉइड आणि विविध प्रकारच्या रक्त चाचण्या करून घेण्यासाठी बाहेर पाठवले जाते. लगेच रिपोर्ट हवा असे सांगून रुग्णांच्या नातेवाईकांवर दबाव निर्माण केला जातो. त्यामुळे खासगी पॅथॉलॉजीमध्ये हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत. महिनाभरापूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने धडक देत यासह अनेक समस्यांबाबत रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले होते. तेव्हा एका महिन्यात स्थिती सुधारणार असल्याचे आश्वासन पालिका प्रशासनाकडून देण्यात आले होते, मात्र याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने गोरगरीब रुग्णांचे हाल सुरूच आहेत.
रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी सीटीस्पॅन, एमआयआर आणि सोनोग्राफी या मशीन्स जहाजाने किंवा थेट एअरलिफ्ट करून आणल्या जातील असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. डीनना आपल्या अधिकारात २० लाखांपर्यंची औषधे खरेदी करण्याचे अधिकार देण्यात येणार होते. औषधे खरेदीसाठीचा निधी चारशे कोटींवरून दुप्पट करून नजीकची मेडिकल बंद करण्याचे जाहीर करण्यात आले होते, मात्र अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
रुग्णालयात आवश्यक असणाऱया शेडय़ुलमध्ये विविध प्रकारचे व्हॅक्सिन, टॅबलेट, ऑइनमेंट, सर्जिकल मटेरियल, औषधे, इंजेक्शन, ऑक्सिजन बॉटल, रबर प्रॉडक्ट, सलाइन सेट, सलाइन, कॉटन बॅण्डेज आदींचा समावेश असून निविदा प्रक्रिया रखडल्याने यातील ४० टक्के सुविधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. बहुतेक औषधे रुग्णालयातील औषध भांडारात उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. यात मोठे गौडबंगाल असल्याचा आरोप आहे. डॉक्टर आणि केमिस्टचे साटेलोटे आहे. त्यातून स्टॉकमध्ये नसलेली औषधे लिहून दिली जातात व त्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकाला बाहेरचे केमिस्ट गाठावे लागते. सिटीस्कॅन
केईएममध्ये सिटीस्कॅन बंद असल्याने या ठिकाणी बाराशे रुपयांत होणाऱया सिटीस्कॅनसाठी खासगी लॅबमध्ये साडेतीन ते पाच हजार रुपये मोजावे लागत आहेत, तर ‘एमआरआय’ रुग्णालयात केल्यास अडीच हजार रुपयांत होऊ शकत असताना खासगी लॅबमध्ये पाच हजारांपर्यंतचा खर्च येत आहे. केईएममध्ये थायरॉइडच्या टेस्टसाठी १७० रुपये खर्च येत असताना बाहेर ५४० रुपये मोजावे लागत आहेत. तीन महिन्यांच्या ब्लड टेस्टसाठी १७० रुपयांच्या जागी ६०० रुपये, १०० रुपयांत होणाऱया सोनोग्राफीसाठी खासगी लॅबमध्ये हजार ते दीड हजार रुपये खर्च येत आहे.


