मुंबई

कचरा साठविण्यासाठी स्मार्ट डब्बे महापालिकेकडून ११ कोटीचा निधी मंजूर

मीरारोड : मिरा भाईंदर शहरात रस्त्याच्याकडेला कचरा जमा करण्यासाठी डिजिटल यंत्रणा असलेले स्मार्ट डब्बे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी जवळपास ११ कोटी रुपये खर्च करण्याचा प्रशासकीय ठराव मंजूर करण्यात आला आहे. मिरा भाईंदर शहरातून दैनंदिन निघणारा कचरा उचलून तो उत्तन येथील घनकचरा प्रकल्पात नेला जातो. हे काम खासगी कंत्राटदाराच्या मदतीने केले जाते. सध्या शहरातील प्रभाग क्रमांक १, २, ३ मधील कचरा उचलण्यासाठी ‘ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट’ आणि प्रभाग क्रमांक ४, ५, ६ येथील कचरा गोळा करण्यासाठी ‘कोणार्क’ या दोन स्वतंत्र कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार कचरा जमा करण्यासाठी महापालिकेकडून कचरा संकलन केंद्र उभारण्यात आले आहे.येथे मोठ्या कचऱ्याचे डब्बे उभारले असून, दिवसभर निघणारा कचरा येथे जमा केला जातो. मात्र अनेकवेळा हे डब्बे लवकर भरत असल्याचे दिसून येतात. परिणामी, नागरिक आपला कचरा डब्ब्यात टाकण्याऐवजी त्याभोवती टाकून जातात. यामुळे दुर्गंधी पसरते आणि डासांची उत्पत्ती होते. तसेच रस्त्याच्या कडेला कचरा साचल्याने शहराची प्रतिमा देखील खराब होते. त्यामुळे यावर उपाय म्हणून शहरात डिजिटल यंत्रणांनी युक्त असलेले स्मार्ट डब्बे बसवण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला आहे. हे डब्बे भरताच त्याची माहिती स्वच्छता निरीक्षकांना मिळणार असून, ते लगेचच रिकामे करण्याची यंत्रणा प्रशासनाकडून उभारली जाणार आहे. यासाठी जवळपास ११ कोटी रुपयांच्या खर्चास महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी प्रशासकीय ठराव करून मंजुरी दिली आहे. तसेच याबाबतची निविदा देखील प्रशासनाने प्रसिद्ध केली असल्याचे महापालिकेने सांगितले आहे शहरात रस्त्याच्याकडेला बसवण्यात येणाऱ्या कचऱ्याच्या डब्यांमध्ये डिजिटल मशीन असणार आहे. ही मशीन ऑनलाईनरित्या मुख्य यंत्रणेशी जोडली जाणार आहे. प्रत्येक डब्ब्याला एक विशेष क्रमांक दिला जाणार आहे. यामुळे कचऱ्याचे डब्बे भरताच त्याची माहिती यंत्रणेला आपोआप मिळणार आहे. या मदतीने भरलेले कचऱ्याचे डब्बे निश्चित ठिकाणी (लोकेशनवर ) जाऊन स्वच्छता निरीक्षक किंवा कचरा संकलन करणाऱ्या वाहनाच्या मदतीने उचलले जाणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे हे डिजिटल डब्बे पूर्णतः सौर उर्जेवर चालणार आहेत. मिरा भाईंदर शहरात सध्या जवळपास २३७ हून अधिक कचरा संकलन केंद्रे आहेत. त्यामुळे स्मार्ट डब्ब्यांचा प्रयोग करण्यासाठी सुरुवातीला २५ ठिकाणांची निवड केली जाणार आहे. प्रामुख्याने ही ठिकाणे शहरात शंभर किलोपेक्षा जास्त कचरा जमा करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांच्या जवळ असतील, अशी माहिती उपायुक्त सचिन बांगर यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button