बनावट क्राईम ब्रँचचे अधिकारी बनून लुबाडणाऱ्या आंतरराज्य टोळीचा आचोळे पोलिसांकडून पर्दाफाश

वसई : ठाणे क्राईम ब्रँच पोलीस असल्याचे भासवून एका इव्हेंट मॅनेजरला कारमध्ये बसवून लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळीला आचोळे पोलिसांनी अवघ्या चार तासांत बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपींकडून लुटलेली रक्कम, गुन्ह्यात वापरलेली कार व दुचाकी असा एकूण १४ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. वसई विरार शहरात घरफोडी, वाहन चोरी, लूटमार अशा विविध प्रकारचे गुन्हे घडू लागले आहेत. नुकताच नालासोपारा येथे राहणारे नितेश उमेश सुरजन (२७) हे २० फेब्रुवारीला रात्री त्यांच्या मित्रांच्या सोबत युको बँक या परिसरातून २ लाख ६९ हजार रुपयांची रक्कम घेऊन जात होते. याच दरम्यान त्याठिकाणी एका अर्टिगा कारमधून आलेल्या अज्ञात टोळीने त्यांना ‘आम्ही ठाणे क्राईम ब्रँचचे पोलीस आहोत’ असे सांगून दमदाटी केली. आरोपींनी नितेश यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून आचोळे येथील स्मशानभूमी रोडवर नेले. तिथे त्यांना जेलमध्ये टाकण्याची भीती दाखवत मारहाण केली आणि त्यांच्याकडील २.६९ लाखांची रक्कम घेऊन पळ काढला.
या प्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजित कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास सुरू केला होता. तांत्रिक विश्लेषण आणि घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी सुधीर शांताराम लांडगे या संशयिताला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता अन्य चार साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. यात सुधीर शांताराम लांडगे (३५), किरण जगन्नाथ दळवी (३४), राजेश सदाशिव गोसावी ( ४०), आदिल मोहम्मद हाफिज सय्यद (३२), सुंदर पालेराम चावरीया (४०) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून लुटलेली रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली अर्टिगा कार, तीन मोटारसायकल आणि मोबाईल असा एकूण १४ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी सुधीर लांडगे आणि किरण दळवी यांच्यावर यापूर्वी ३ गुन्हे दाखल आहेत, तर सुंदर चावरिया याच्यावर २ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजितकुमार पवार, पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक मंगेश वडणे, गुरुदास मोरे, दत्तात्रय दत्तात्रय दाईंगडे, शंकर शिंदे, निखील चव्हाण, विनायक कचरे व त्यांच्या पथकाने केली आहे.



