गुन्हे

लाचखोरीचे मोठे प्रकरण: ४० लाखांच्या लाचेसह मध्य रेल्वेचा वरिष्ठ अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

मुंबई : खासगी कंपनीला ४० कोटींचे कंत्राट देण्यासाठी ४० लाख रुपयांची लाच मागणाऱ्या मध्य रेल्वेच्या मुख्य विद्युत वितरण अभियंत्यांसह दोन खासगी इसमांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी उशिरा अटक केली. संबंधित अधिकाऱ्याशी संबंधित मुंबई, नवी मुंबई, कर्जत येथील पाच ठिकाणी छापे टाकून सुमारे ९० लाख रुपयांची रोकड तसेच ४२ लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. भारतीय रेल्वे सेवेतील विद्युत अभियंते २००३ मधील तुकडीतील हे अधिकारी आहेत. मध्य रेल्वेकडून विविध कामांसाठी ४० कोटींचे कंत्राट देण्यासाठी निविदा मागविण्यात आली होती. या निविदेत घोटाळा झाल्याची माहिती सीबीआयला मिळाली होती. त्यामुळे या प्रकरणी चौकशी सुरु होती. संबंधित निविदा देण्यासाठी मुख्य विद्युत वितरण अभियंते रमेश कुमार चौवे यांनी कंत्राट रकमेच्या एक टक्का म्हणजे ४० लाख रुपयांची लाच मागितली होती. या लाचेचा दहा लाखांचा हप्ता स्वीकारला जाणार असल्याची माहिती मिळाल्यावरुन सापळा रचण्यात आला होता. चौवे हे प्रत्यक्ष लाच स्वीकारत असतानाच सीबीआय अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली. त्यांच्या कार्यालयातून दहा लाखांच्या लाचेची रक्कम ताब्यात घेण्यात आली. चौवे यांच्यासह अंशुल वर्मा आणि कनाय वर्मा या खासगी इसमांनाही सीबीआयने अटक केली. चौवे यांच्या कार्यालयात लाचेच्या रकमेव्यतिरिक्त तीन लाख ८५ हजार रुपयांची रोकड सापडली. याशिवाय निवासस्थानी ९०.७९ लाखांची रोकड तसेच २४१.३० ग्रॅम सोने तसेच २५७७ ग्रॅम चांदी असा ४२.५२ लाखांचा ऐवज सापडला. या शिवाय या छाप्यात मालमत्तेत गुंतवणूक केल्याचीही कागदपत्रे सीबीआयच्या हाती लागली. याशिवाय देशभरातही काही ठिकाणी या मालमत्ता असल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले. आतापर्यंत एक कोटी ४७ लाखांची एकूण मालमत्ता सीबीआयने हस्तगत केली आहे. या शिवाय काही आक्षेपार्ह कागदपत्रेही सापडली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button