राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक अमृत (मुघल) उद्यान आता सर्वसामान्यांसाठी खुले

नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचे आता अमृत उद्यान असे नामकरण करण्यात आले आहे. अमृत महोत्सवांतर्गत उद्यानाचे नामकरण करण्यात आले आहे. अमृत उद्यान (मुघल गार्डन) येथे ट्यूलिपच्या १२ जाती आहेत. आता हे उद्यान दरवर्षीप्रमाणे सामान्यांसाठीही खुले झाले असून, येथे लोकांना ट्युलिप्स आणि गुलाबांची फुले पाहता येणार आहेत.
दरवर्षी अमृत उद्यान सर्वसामान्यांसाठी खुले केले जाते, जे आजपासून खुले झाले आहे. ते २६ मार्चपर्यंत दोन महिने खुले राहणार आहे. उद्यान उघडण्याची वेळ सकाळी १० ते दुपारी ४ अशी असेल. २८ मार्चला शेतकऱ्यांसाठी, २९ मार्चला दिव्यांगांसाठी आणि ३० मार्चला पोलिस आणि लष्करासाठी खुले होणार आहे.
सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत ७५०० लोकांसाठी तिकीट उपलब्ध असेल. त्यानंतर १२ ते ४ या वेळेत १० हजार लोकांना प्रवेश मिळणार आहे. राष्ट्रपती भवन परिसरात हे उद्यान आहे. बागेत विशेष प्रकारची 12 ट्युलिप फुलांची लागवड करण्यात आली आहे. बागेत सेल्फी पॉइंटही आहेत, तसेच फूड कोर्टही येथे सुरू होणार आहे. क्यूआर कोडवरून लोकांना वनस्पतींच्या विविध प्रकारांची माहिती मिळू शकेल. तसेच १२० प्रकारचे गुलाब आणि ४० सुगंधी गुलाब आहेत.
उद्यानात अशी मिळेल एंट्री
अमृत उद्यानाला भेट देण्यासाठी लोक त्यांचा स्लॉट ऑनलाइन बुक करू शकतात. जर तुम्ही ऑनलाइन बुकिंग करू शकत नसाल, तर तुम्हाला सुविधा काउंटरवर तसेच इमारतीच्या गेट क्रमांक १२ जवळील किओस्कवर नोंदणी करावी लागेल. तुम्हाला गर्दी टाळायची असेल तर ऑनलाइन स्लॉट बुकिंग हा एक चांगला पर्याय आहे.
राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत वेबसाइट (rashtrapatisachivalaya.gov.in) वर जाऊन ऑनलाइन पद्धतीने बुकिंग करता येते. तसेच ऑनलाइन बुकिंग ( rb.nic.in/rbvisit/visit_plan.aspx.) द्वारे देखील करता येते राष्ट्रपतींच्या सचिवालयाने लोकांना गर्दी टाळण्यासाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी आगाऊ स्लॉट ऑनलाइन बुक करण्याचा सल्ला दिला आहे.



