मराठमोळे शिल्पकार राम व्ही. सुतार घडविणार अयोध्यातील प्रभू श्रीराम आणि सीतामातेच्या मूर्ती

अवघ्या देशवासीयांचे लक्ष अयोध्येत साकारणाऱ्या भव्यदिव्य श्रीराम मंदिराकडे लागले आहे. प्रभू श्रीराम आणि सीतामातेच्या मूर्ती घडवण्याची जबाबदारी ९८ वर्षीय मराठमोळे शिल्पकार राम व्ही. सुतार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. याशिवाय अयोध्येत श्री रामाचा सर्वाधिक उंची असणारा पुतळा देखील ते मुलगा अनिल सुतार यांच्या सहकार्याने उभारणार आहेत.
मूळचे धुळे जिल्ह्यातील गोंडूर या गावातील असलेल्या शिल्पकार राम सुतार यांनी श्रीरामकृष्ण जोशी यांच्याकडून प्रेरणा घेतली. पुढे जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. त्यानंतर दिल्लीमध्ये त्यांनी केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागात काम केले. दिल्लीच्या लक्ष्मी नगरमध्ये त्यांनी स्टुडिओ सुरु केला होता. नोएडामध्ये ते १९९० मध्ये स्थलांतरीत झाले. साहिबाबादमध्ये २००६ साली त्यांनी त्यांची कास्टिंग फॅक्टरी सुरू केली.
मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांचा २१२ मीटर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३७.२ मीटरचा पुतळा बनवण्याची जबाबदारी राम सुतार यांच्याकडे आहे. कर्नाटकात भगवान शंकराची ४६.६ मीटरची मूर्ती देखील ते साकारत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पद्मश्री, पद्मभूषण तसेच बॉम्बे आर्टस् सोसायटीने तीन पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे.
उत्तुंग योगदान
राम सुतार यांनी १९५४ ते १९५८ मध्ये अजिंठा आणि वेरुळ येथील संवर्धनाच्या कामात मोलाचे योगदान दिले होते. मध्य प्रदेशात एका दगडातून त्यांनी चंबळ स्मारकाची निर्मिती केली. भाक्रा नांगल धरणाची निर्मिती करणाऱया मजुरांच्या सन्मानासाठी पंडित जवाहरलाल नेहरु यांनी ५० फूट उंंचीच्या कामगारांचा पुतळा उभारण्याचे काम सुतार यांना दिले होते. संसदेतील महात्मा गांधी यांची मूर्ती, अयोध्येतील गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे वीणा शिल्प, गुजरातमधील १८२ मीटर ऊंच असणारी श्रीरामाची मूर्ती तसेच स्टॅच्यू ऑफ यूनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा देखील त्यांनी साकारला आहे.
शाळिग्राम शिळा अयोध्येत दाखल
नेपाळच्या गंडकी नदीतील ६ कोटी वर्ष जुन्या दोन शाळिग्राम शिळा अयोध्येत दाखल झाल्या आहेत. शरयू नदीच्या पुलावर २-३ हजार लोकांनी पुष्पवृष्टी करून आणि ढोल वाजवून उत्सव वातावरणात त्यांचे स्वागत केले. माहितीनुसार, सर्व शिळांची तपासणी केल्यानंतर त्यातील एका शिळेचा वापर गर्भगृहाच्या वरच्या पहिल्या मजल्यावर बनवल्या जाणाऱया दरबारातील श्रीरामाची मूर्ती बनवण्यासाठी केला जाणार आहे. त्याचबरोबर लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या मूर्तीही याच शिळांपासून बनवल्या जाणार आहेत.



