
तृणमूल कॉंग्रेसच्या संस्थापक अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे सूर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी कधीच जुळले नाहीत. विरोधी पक्षांची भाजपविरोधी एकजूट झाल्यास तिचे नेतृत्व राहुल यांनी करावे, अशी कॉंग्रेसजनांची इच्छा असली, तरी ममतांना त्यांचे नेतृत्व कधीच मान्य नव्हते व नाही.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेसला सतत झटकून टाकणाऱ्या ममतांचा सूर कर्नाटक विधानसभा निकालानंतर बदलला. ज्या ठिकाणी कॉंग्रेस पक्षाची ताकद आहे त्या ठिकाणी आम्ही यापुढे त्यांना पाठिंबा देण्यासाठी तयार आहोत; परंतु त्यांनी पश्चिम बंगालमध्ये आमच्यासोबत जी रोजची लढाई सुरू केली आहे, ती प्रथम थांबवावी, असे उद्गार त्यांनी काढले आहेत. कॉंग्रेसचा पश्चिम बंगालमधील एकमेव आमदार नुकताच तृणमूल कॉंग्रेसमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे उभयपक्षांत पुन्हा एकदा कटुता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ममता यांनी १९७० च्या दशकात कॉंग्रेस कार्यकर्त्या म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली. १९७५ साली लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधी सरकारविरुद्ध आघाडी उघडली होती. त्यावेळी त्यांच्या कारवर ममता चक्क थयथया नाचल्या होत्या. त्यामुळे त्या एकदम प्रकाशझोतात आल्या आणि १९७६ ते ८० या काळात पश्चिम बंगाल महिला कॉंग्रेसच्या सरचिटणीस म्हणून त्या काम पाहात होत्या. १९८४ साली त्यांना अत्यंत तरुण वयात कॉंग्रेसचे लोकसभेचे तिकीट मिळाले आणि त्यांनी जादवपूर लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते सोमनाथ चॅटर्जी यांचा पराभव केला. त्यानंतर ममतादीदींची भारतीय युवक कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसविरोधी लाट असल्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या मालिनी भट्टाचार्य यांनी दीदींचा पराभव केला; परंतु पुढे लोकसभा निवडणुकांत दीदींनी कोलकाता दक्षिण लोकसभा मतदारसंघात सातत्याने विजय मिळवला. दीदींच्या या कर्तृत्वामुळेच त्यांना कॉंग्रेस पक्षाने नेहमी संधी दिली.
पंतप्रधान नरसिंह राव यांच्या सरकारात दीदी मनुष्यबळ, युवक कल्याण, क्रीडा तसेच महिला व बालविकास खात्याच्या राज्यमंत्री होत्या; परंतु देशातील क्रीडा सुविधा वाढवण्यासाठी आपण दिलेले प्रस्ताव पंतप्रधान मंजूर करत नाहीत याचा राग येऊन, त्यांनी कोलकात्यात राव सरकारचा जाहीर निषेध केला आणि राजीनामा दिला. पश्चिम बंगालमधील माकपचे हस्तक असल्याप्रमाणे कॉंग्रेस वागत आहे. अशी ही कॉंग्रेस स्वच्छ केली पाहिजे, असे मतही दीदींनी व्यक्त केले होते. दीदींनी तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू तसेच बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीच्या सरकारांविरुद्ध अनेक आंदोलने केली. पश्चिम बंगाल प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष सोमेंद्रनाथ मित्र यांच्याशी मतभेद झाल्यानंतर दीदींनी कॉंग्रेस पक्ष सोडला आणि तृणमूल कॉंग्रेसची स्थापना केली. स्थापनेनंतर तृणमूल कॉंग्रेसने बरीच वर्षे भाजपची साथ केली. ममतादीदी भाजपप्रणीत रालोआ आघाडीच्या सरकारात केंद्रीय मंत्रीही होत्या; परंतु नरेंद्र मोदी यांच्या नेतृवाखालील भाजपला देशपातळीवर प्रचंड यश मिळाले आणि पश्चिम बंगालमध्येही सत्ता मिळवण्याची स्वप्ने भाजप पाहू लागला.
एकेकाळी पश्चिम बंगालमध्ये असलेली डाव्या आघाडीची सत्ता संपून तृणमूलचे सरकार आले. त्यानंतर गेल्या दहा-बारा वर्षांत राज्यातील डावे पक्ष आणि कॉंग्रेस दोन्ही संपले. उलट तृणमूल विरुद्ध भाजप, असा थेट संघर्ष सुरू झाला. तृणमूलसह अनेक प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा विडा भाजपने उचलला असून, त्याविरोधात विरोधी एकजूट निर्माण करण्याकरिता १२ जून रोजी पाटणा येथे एक बैठक होणार आहे. त्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पुढाकार घेतला असून, या बैठकीस स्वतः ममतादीदी हजर राहणार आहेत. आम आदमी पक्ष, तृणमूल कॉंग्रेस आणि बीआरएस किंवा भारत राष्ट्र समिती यांचे कॉंग्रसेशी मतभेद असून, ते दूर करण्याचा प्रयत्न नितीशकुमार करत आहेत. एकेकाळी जयप्रकाश नारायण यांनी बिहारमधूनच इंदिरा गांधींविरुद्ध मोहीम सुरू केली होती. म्हणून तेथूनच यावेळीही जंग छेडली पाहिजे, अशी कल्पना प्रथम दीदींनीच मांडली आणि नितीशकुमार यांनी ती उचलून धरली.
अर्थात, तृणमूल व कॉंग्रेस यांच्यातील दरी बुजवण्यासाठी अजून मोठाच पल्ला गाठावा लागेल. पाटणा येथे जे कही घडायचे ते घडेल परंतु पश्चिम बंगालमध्ये कॉंग्रेस तृणमूलशी संघर्ष करतच राहील, अशी गर्जना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीररंजन चौधरी यांनी केली आहे. संसदेत भाजपच्या विरोधात आम्ही जेव्हा जेव्हा आवाज उठवतो, तेव्हा तेव्हा तृणमूल कॉंग्रेस कधी आमच्याबरोबर असते, तर कधी नसतेही, अशी टीकाही चौधरी यांनी केली आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकांत तृणमूल कॉंग्रेस आघाडीत सामील झाली होती. त्याचप्रमाणे २०११ च्या विधानसभा निवडणुकीतही उभयतांनी एकमेकांशी सहकार्य केले होते. परंतु २०१२ मध्ये दीदींनी कॉंग्रेसशी असलेले आपले नाते तोडले आणि “एकला चलो’चे धोरण स्वीकारले.
राज्यातील अनेक कॉंग्रेस नेत्यांना त्यांनी पक्षात सामील करून घेतले आणि राहुल गांधींवर सतत टीका करण्यास सुरुवात केली. खरे तर जुलै २००८ मध्ये जेव्हा अणुकराराच्या मुद्द्यावरून डाव्या पक्षांनी कॉंग्रसप्रणीत यूपीए सरकारचा पाठिंबा काढून घेतला, तेव्हा विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी दीदींनी कॉंग्रेसला पाठिंबा दिला होता. २००९ मध्ये तर तृणमूल व कॉंग्रेस यांनी डाव्या आघाडीच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली, तेव्हा डाव्यांना फक्त 15 जागा मिळाल्या होत्या. उलट कॉंग्रेस व तृणमूलने मिळून 26 जागा पटकावल्या. २०११ च्या विधानसभा निवडणुकांत तृणमूल व कॉंग्रेसने मिळून विधानसभेच्या २९४ पैकी २२८ जागा मिळवल्या. त्यावेळी दीदींच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारात कॉंग्रेस पक्षही सामील झाला होता.
परंतु २०१२ च्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसने प्रणव मुखर्जी यांची उमेदवारी घोषित केली, हे दीदींना आवडले नाही. लवकरच तृणमूलने मनमोहन सिंग सरकारला असलेला पाठिंबा काढून घेतला आणि तिकडे कॉंग्रेस पक्ष पश्चिम बंगालमधील ममता सरकारमधून बाजूला झाला. आता पुन्हा या दोन पक्षांना एकत्र यायचे असेल, तर दीदींनी आपल्या लहरी स्वभावास मर्यादा घालाव्या लागतील आणि कॉंग्रेसला व्यावहारिक शहाणपणा दाखवावा लागेल. अन्यथा पुन्हा पहिले पाढे पंचावन्न असतीलच.



