मुंबई

राज्यात लवकरच अत्याधुनिक १७८६ रुग्णवाहिकेसह कोकणासाठी बोट रुग्णवाहिका सुविधा

मुंबई : कोणत्याही संकटाच्या वेळी पहिल्या एक तासात म्हणजेच सुवर्ण तासात वैद्यकीय मदत उपलब्ध होऊन त्याचे संबंधिताचे प्राण वाचविण्यासाठी राज्यातील आरोग्य सेवा अधिक भक्कम करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे व सुविधांसह सुसज्ज अशा १ हजार ७८६ रुग्णवाहिका खरेदी केल्या जाणार आहेत.  यामध्ये आधुनिक जीवन रक्षक रुग्णवाहिकेसह कोकण किनारपट्टीसाठी प्रथमच बोट रुग्णवाहिकांचा समावेश आहे.

अपघात, दुर्घटना किंवा गंभीर आजारी व्यक्तीला तातडीने प्रथमोपचार मिळावेत तसेच पुढील उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात  दाखल करता यावे यासाठी राज्य सरकारने सन २०१४ मध्ये राज्यात मोफत रुग्णवाहिका योजना सुरू केली. राज्याच्या कोणत्याही भागातून केवळ १०८ क्रमांकावर दूरध्वनी करून मोफत रुग्णवाहिकेची सुविधा मिळविता येते. गेल्या १० वर्षांत या योजनेंतर्गत राज्यात कार्यरत ९३७ रुग्णवाहिकांच्या माध्यमातून राज्यातील तब्बल ८८ लाख आठ हजार रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. यामध्ये गर्भवती किंवा बाळंतपणात अडचणीत सापडलेल्या १५ लाख ३१ हजार महिलांना मदत मिळाली. तर ३९ हजार बालकांचा याच रुग्णवाहिकांमध्ये जन्म झाला. विविध अपघातात पाच लाख, हृदयरोगाच्या ५४ हजार रुग्णांना याच रुग्णसेवेमुळे वेळेत उपचार मिळाले असून या योजनेवर १० वर्षांत २६३३ कोटी रुपये खर्च झाले.

राज्यातील वाढती लोकसंख्या आणि महामार्गाचे जाळे याचा विचार करून या योजनेची व्याप्ती वाढवितानाच आरोग्य व्यवस्था अधिक भक्कम करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी ७५९ कोटी रुपये खर्चून आधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि सुविधांनी सुसज्ज अशा १ हजार ७८६ रुग्णवाहिका घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये २५५ जीवन रक्षक, प्रत्येक जिल्ह्यात एक याप्रमाणे बालरोगतज्ज्ञ आणि काचेच्या पेटय़ायुक्त (इनक्युबेटर) अशा ३६ नवजात अर्भक रुग्णवाहिका, सागर किनारपट्टी भागासाठी २५ बोट रुग्णवाहिका, आदिवासी दुर्गम भागासाठी १९६ मोटरबाईक रुग्णवाहिकांचा समावेश आहे.

सध्या नंदूरबार जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या बोट रुग्णवाहिकेचा विस्तार आता कोकणात करण्यात येणार आहे. अलिबाग ते मुंबई अंतर रस्ते मार्गे पार करण्यासाठी रुग्णवाहिकांना तीन ते चार तास लागतात. मात्र, अलिबाग ते मुंबई अंतर  बोट रुग्णवाहिका अवघ्या ३० मिनिटांत गाठू शकतील. तसेच समुद्रात मच्छीमारांच्या होणाऱ्या अपघातातही ही सुविधा उपयोगी ठरणार आहे.

अमरावती, गडचिरोली, पालघर, मुंबई, सोलापूर जिल्ह्यात ३० दुचाकी रुग्णवाहिका सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू असून या रुग्णवाहिकांनी एक लाख ६० हजार रुग्णांना उपचार दिले आहेत. आता त्याचा विस्तार राज्यभरात करताना प्रामुख्याने अमरावती, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगांव, अहमदनगर आदी आदिवासी जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात १९६ दुचाकी रुग्णवाहिका सुरू करण्यात येणार आहेत. येत्या १० वर्षांत या योजनेवर सुमारे साडेसात हजार कोटी रुपये खर्च होणार असले तरी त्यामुळे लाखो गरजूंना लाभ होणार असून राज्यमंत्रिमंडळाने या प्रस्तावास नुकतीच मान्यता दिल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button