भारत

लोकसभा निवडणुकीआधी ‘घरोघरी जी-२०’चा संदेश; देणार प्रचारा ला गती

नवी दिल्ली : ‘जी-२०’ शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस दोन्हीही देशभर साजरे होणार असून त्याद्वारे आगामी पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक तसेच, लोकसभा निवडणुकीच्या ‘प्रचारा’ला गती दिली जाईल. त्याची झलक बुधवारी भाजपच्या मुख्यालयात मोदींच्या जंगी स्वागतातून पाहायला मिळाली.

भाजपच्या केंद्रीय निवड समितीच्या बैठकीसाठी आलेल्या मोदींचे पक्ष कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करून अभिनंदन केले. पक्षाच्या मुख्यालयामध्ये बुधवारी दुपारपासून मोठय़ा संख्येने जमलेल्या उत्साही कार्यकर्त्यांची ‘मोदी-मोदी’च्या घोषणा दिल्या. मोदींच्या आगमनापूर्वी मुख्यालयात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. ‘जी-२०’ शिखर परिषदेशी संबंधित मोठ-मोठी फलके लावण्यात आली होती. त्यामध्ये ‘जी-२०’ समूहातील विविध राष्ट्रप्रमुखांशी मोदी संवाद साधत असलेली अनेक छायाचित्रांचा समावेश करण्यात आला होता. जी-२० शिखर परिषदेची ‘यशोगाथा’ घरोघरी पोहोचवण्याची सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आला आहे. मोदींच्या ‘आंतरराष्ट्रीय प्रतिमे’चा प्रचारही केला जाणार आहे.

‘जी-२०’ शिखर परिषदेच्या आयोजनात सहभागी झालेल्या अनेकांचे मोदी व्यक्तीश: आभार मानत आहेत. सुमारे साडेचारशे दिल्ली पोलिसांच्या सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दिल्लीतील प्रत्येक जिल्ह्यातील हवालदारापासून निरीक्षकापर्यंत पोलीस अधिकाऱ्यांना निमंत्रण दिले जाणार आहे. हे सर्व पोलीस भारत मंडपममध्ये मोदींसह भोजनाचा आस्वाद घेतील. पक्षाच्या मुख्यालयात पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रीय निवड समितीतील देवेंद्र फडणवीस आदी सदस्यही उपस्थित होते.

आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी भाजपने सुरू केली असून वेगवेगळय़ा मार्गाने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोदींच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर रोजी विविध कार्यक्रम आयोजित केले जातील तसेच, केंद्र सरकारच्या नव्या योजनाही लागू होतील. विविध प्रकारच्या कुशल कारागिरांसाठी विश्वकर्मा योजना सुरू होईल. या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. गावागावांमध्ये आरोग्य योजना पोहोचवण्यासाठी ‘आयुष्मान भव’ ही योजना सुरू केली जाणार आहे. वंचितांसाठी जाहीर होणाऱ्या नव्या योजना तसेच, जुन्या योजनांचा विस्तारावर आगामी काळात भर दिला जाणार आहे. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात देशभर सेवा पंधरवडा साजरा केला जाणार असून पक्ष कार्यकर्ते व खासदारांना अधिकाधिक लाभार्थीपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button