‘इस्रो’चे तंत्रज्ञान खरेदी करण्यात २३ कंपन्यांनी दाखविला रस

बंगळूर : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्रो) अवकाश मोहिमांमध्ये आलेल्या यशामुळे अनेक बड्या कंपन्यांच्या नजरा या संस्थेने विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर खिळल्या आहेत. ‘इस्रो’ने तयार केलेल्या ‘स्मॉल सॅटेलाईट लाँच व्हेईकल टेक्नोलॉजी’ची(एसएसएलव्ही) खरेदी करण्यात २३ कंपन्यांनी रस दाखविला असल्याची माहिती ‘इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ॲथोरायझेशन सेंटर’ चे (आयएन-एसपीएसीई) अध्यक्ष पवन. के. गोयंका यांनी दिली.
‘आम्ही विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा अन्य खासगी कंपन्या कसा वापर करतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल,’ असे त्यांनी नमूद केले. ‘तंत्रज्ञान हस्तांतराच्या अनुषंगाने आम्ही केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला असून हे तंत्रज्ञान मिळावे म्हणून तब्बल २३ कंपन्यांनी अर्ज केले असून त्यातील फक्त एकाच कंपनीला हे मिळणार आहे,’ असे गोयंका यांनी स्पष्ट केले.
‘इस्रो’च्या अवकाश विभागांतर्गत २०२० मध्ये ‘आयएन-एसपीएसीई’ या नोडल एजन्सीची स्थापना करण्यात आली होती. बिगरशासकीय संस्थांच्या अवकाश कार्यक्रमांना प्रोत्साहन देणे आणि त्याच्यावर देखरेख ठेवण्याचे काम या संस्थेकडून केले जाते. या संस्थेने उपग्रहांसाठी तयार केलेले तंत्रज्ञान इतर कंपन्यांना देण्याची तयारी दर्शविली होती.
‘इस्रो’ने तयार केलेल्या तंत्रज्ञानाचा खासगी क्षेत्राला नेमका कसा लाभ होतो? हे पाहण्यासाठी आम्ही खरोखरच उत्सुक आहोत. ‘एसएसएलव्ही’ या तंत्रज्ञानाच्या हस्तांतरामध्ये आम्ही संबंधित खासगी कंपनीला व्हेईकल लॉक, स्टॉक आणि बॅरल हे सर्व काही उपलब्ध करून देणार आहोत.’’ असे गोयंका यांच्याकडून सांगण्यात आले.
‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री’ (सीआयआय) च्या वतीने आयोजित करण्यात आंतरराष्ट्रीय अंतराळविषयक परिषदेमध्ये बोलताना गोयंका यांनी ही माहिती दिली. ‘‘ प्रक्षेपकाचा पूर्ण आराखडा एखाद्या खासगी कंपनीला उपलब्ध करून देण्याची ही पहिलीच वेळ आहे. खासगी क्षेत्राला जवळपास ४२ अवकाशविषयक तंत्रज्ञान आणि ॲप्लिकेशन उपलब्ध करून देण्यात येतील, जगामध्ये प्रथमच ही गोष्ट घडते आहे.’’ असे गोयंका यांच्याकडून सांगण्यात आले.
सध्या भारतीय अवकाश अर्थव्यवस्था ही ८ अब्ज अमेरिकी डॉलर एवढी असून २०३३ पर्यंत ती ४४ अब्ज डॉलरवर नेण्याचा आमचा इरादा आहे. या आर्थिक भरारीमध्ये प्रत्येकाला आपले योगदान द्यावे लागेल.- पवन. के. गोयंका, ‘आयएन-एसपीएसीई’चे अध्यक्ष



