नवी मुंबईत अमली पदार्थांसह नायजेरीयन अटकेत

नवी मुंबई : खारघर सेक्टर-१३ मध्ये अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या एका नायजेरियन नागरिकाला खारघर पोलिसांनी अटक केली. च्युक्वेबुका एबल उडेह (३०) असे या नायजेरियन नागरिकाचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याच्याजवळ असलेले ६ लाख रुपये किमतीचे ६० ग्रॅम वजनाचे एमडी जप्त केले आहे.
खारघर पोलिस ठाण्यातील पथक गस्त घालत असताना खारघर सेक्टर-१३ भागातील बस स्टॉपवर गुरुवारी (ता. २८) सायंकाळी पाचच्या सुमारास एक नायजेरियन व्यक्ती अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे खारघर पोलिसांचे पथक खारघर सेक्टर-१३ मध्ये पोहोचले असताना तेथील बस स्टॉपवर नायजेरियन नागरिक संशयास्पदरित्या आढळून आला. पोलिसांना पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशामध्ये एमडी अमली पदार्थ आढळून आले. पोलिसांनी एनडीपीएस कलमाखाली त्याला अटक केली आहे.



