
वृत्तसंस्था : पॅलेस्टाईनमधील गाझापट्टीत भडकलेल्या युद्धाचा वणवा अतिशय वेगाने पसरतोय. इस्रायली सैनिक आणि हमास दहशतवाद्यांमध्ये संघर्ष टोकाला गेला असून भयंकर विध्वंस घडला आहे. जागोजागी रस्त्यांवर रक्ताचा सडा आणि मृतदेहांचा खच पडला आहे. इस्रायली सैनिकांकडून गाझापट्टीत सातत्याने हवाई हल्ले सुरू आहेत. इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत दोन हजारांवर इस्रायली आणि पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलच्या सैनिकांनी हमासच्या दहशतवाद्यांवर प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात तब्बल ४०० दहशतवादी मारले गेल्याचा, तर इस्रायलच्या ४४ सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती महत्त्वपूर्ण पावले उचलण्याचे सर्वाधिकार इस्रायलच्या सुरक्षा पॅबिनेटने सरकारला देण्यात आले आहेत. तसेच अधिकृतरित्या युद्ध जाहीर केले आहे. गेल्या ५० वर्षांत देशात झालेला हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे सांगितले जात आहे.
इस्रायल आणि हमास दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत तब्बल २०४८ नागरिक जखमी झाले असून त्यातील ३३० गंभीर आणि २० अत्यवस्थ असल्याचे इस्रायलमधील प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. इस्रायलमध्ये तब्बल १८ हजार हिंदुस्थानी नागरिक कामाच्या निमित्ताने राहात असून युद्धामुळे अनेक भागांत वीज, इंटरनेटची सुविधा नसल्याचे एका हिंदुस्थानी नागरिकाने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. हमासच्या दहशतवाद्यांनी थायलंडच्या ११ नागरिकांना आपल्या ताब्यात ठेवल्याची माहिती आहे. अमेरिकेने इस्रायलला पाठिंबा दर्शविला असून लष्करी मदत पाठविली आहे. तसेच हमासच्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.
हमासने हल्ला केल्यानंतर इस्रायलच्या मोठय़ा संख्येने महिला बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. या महिलांचे हमासच्या दहशतवाद्यांनी अपहरण केल्याची आणि बलात्काराचा शस्त्र म्हणून वापर केला जात असल्याची भीती ‘इस्रायल वॉर रूम’कडून व्यक्त करण्यात आली आहे. ‘इस्रायल वॉर रूम’ या स्वयंसेवी संस्थेने आपल्या अधिकृत अकाऊंटवर हमासच्या हल्ल्यानंतर बेपत्ता झालेल्या महिलांचे पह्टो शेअर केले आहेत. हमासने इस्रायलविरोधात ‘अल-अक्सा फ्लड’ असे ऑपरेशन सुरू केले आहे तर इस्रायलच्या सैन्याने हमासविरोधात ‘स्वॉर्ड्स ऑफ आयर्न’ ऑपरेशन सुरू केले आहे. अल-अक्सा मशिदीला इस्रायलने अपवित्र केल्याचा बदला घेतल्याचे हमासचा कमांडर मोदम्मद दीफने सांगितले. तर जे अरब देश इस्रायलशी मैत्री करत आहेत त्यांच्यासाठी ही कारवाई आपले उत्तर असल्याचे हमासचा प्रवक्ता गाजी हामद याने म्हटले आहे.
– एका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी इस्रायलला गेलेली नुसरत भरुचा अखेर आज हिंदुस्थानात सुखरूप परतली. दुपारी अडीच वाजता मुंबई विमानतळावरून बाहेर पडताच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी तिला घेरले. त्यावेळी तिने मला थोडा वेळ द्या अशी विनवणी केली. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱयांनी तिला कारपर्यंत सोडले.
– ब्रिटनच्या मंत्री रॉबर्ट जेनरिक यांनी हमासच्या हल्ल्याचाचा निषेध केल्यानंतर लंडनमध्ये विविध ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
– इजिप्तमध्ये आज एका पोलीस कर्मचा-याने दोन इस्रायली पर्यटकांची गोळय़ा घालून हत्या केली. यावेळी मिस्रच्या एका नागरिकाचाही गोळय़ा लागून मृत्यू झाला.
– चीनने पॅलेस्टाइन आणि इस्रायलमधील नागरिकांच्या सुरक्षेसाठी युद्ध थांबवावे तसेच दहशतवाद्यांची मागणी मान्य करण्याचे आवाहन केले आहे.
– ४ नेपाळी विद्यार्थी जखमी असून ११ विद्यार्थी बेपत्ता असल्याचे वृत्त आहे.
गाझापट्टीत भडकलेल्या युद्धाचे लाइव्ह रिपोर्टिंग करताना अल जझिरा या वृत्तवाहिनीच्या एका महिला अँकरला अक्षरशः अंगावर काटा आणणारा अनुभव आला. ही महिला रिपोर्टिंग करत असताना अचानक तिच्या मागे असणाऱया इमारतीत भयंकर स्पह्ट होतो. या स्पह्टाच्या आवाजाने आसपासचा परिसर हादरून जातो आणि त्यामुळे ही महिला अँकरही प्रचंड घाबरून किंकाळी पह्डते. असा प्रसंग वृत्तवाहिनीच्या कॅमेऱयात कैद झाला आहे.
हिंदुस्थानातून तेल अविव्हकडे जाणारी आणि येणारी विमान उड्डाणे १४ ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आली आहेत. तसेच १४ कर्मचारी दिल्लीत परतल्याची माहिती आहे. एकीकडे हमासने हल्ले केले असताना दुसरीकडे लेबनॉनमधील हेजबोल्लानेही मोर्टार डागण्यास सुरुवात केली आहे. उत्तरेकडील इस्रायलमध्ये होत असलेल्या हल्ल्यांची जबाबदारीही या संघटनेने घेतली असून त्यामुळे इस्रायलची डोकेदुखी आणखी वाढली आहे. दरम्यान, लेबनॉन आणि इस्रायल हे दोन्ही देश एकमेकांचे दुश्मन असून या दोन्ही देशांत २००६ मध्ये शांतता करार झाला होता.



