पुण्यात कोयता गँगची दहशत थांबेना; खडकी, चंदननगर भागात तरुणांवर कोयत्याने वार

पुणे : शहरात किरकोळ वादातून कोयते उगारुन दहशत माजविण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाले आहेत. किरकोळ वादातून खडकी आणि चंदननगर भागात टोळक्याने कोयते उगारुन दहशत माजविली. वेगवेगळ्या घटनांमध्ये टोळक्याने तरुणांना मारहाण केली.अक्षय दिलीप गायकवाड (वय २६, रा. गवळीवाडा, खडकी बाजार) याने याबाबत खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी मांडा उर्फ शुभम कवाळे, सॅम्युअल पाटोळे आणि साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय गायकवाड, त्याचे मित्र निलेश शिगवण, किशन ठाकूर, पप्पू तायडे, सचिन खानझोडे, सोनू डोके ओैंध रस्त्यावरील पडाळ वस्ती येथे गेले होते. तेथून अक्षय आणि त्याचे मित्र पुन्हा खडकी बाजारकडे निघाले होते. तेथील एका पानपट्टीवर तेथे सिगारेट ओढण्यासाठी थांबले होते. आरोपींशी अक्षयच्या मित्रांचा वाद झाला होता. आरोपी शुभम, सॅम्युअल आणि साथीदार तेथे आले. या भागात कशाला आला आहात, अशी विचारणा केली. तेव्हा अक्षयचा मित्र निलेशने मी या भागात राहायला असल्याचे सांगितले. या कारणावरुन झालेल्या वादातून आरोपींनी निलेशच्या डोक्यात कोयत्याने वार केला. अक्षय याच्यावर आरोपींनी कोयत्याने वार केले. कोयते उगारुन तसेच दगडफेक करुन आरोपींनी दहशत माजविली. पोलीस उपनिरीक्षक कांबळे अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, मुंढव्यातील केशवनगर भागात वैमनस्यातून एका तरुणावर कोयत्याने वार करुन दहशत माजविल्याची घटना घडली. याबाबत कुणाल संजय साळुंके (रा. मयुरेश्वर काॅलनी, केशवनगर, मुंढवा) याने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनुप ढगे (वय २३, रा. केशवनगर) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. कुणाल आणि आरोपी अनुप याची भांडणे झाली होती. कुणाल केशवनगर भागातील कच्छी दाबेली गाडीजवळ थांबला होता. अनुपने कुणालला शिवीगाळ करुन त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केला. त्यावेळी भांडणात मध्यस्थी करणाऱ्या नागरिकांना धमकावून अनुपने दहशत माजविली असून याबाबत पोलीस उपनिरीक्षक गाडे अधिक तपास करत आहेत.



