
वृत्तसंस्था : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) चांद्रयान-३ च्या माध्यमातून यंदा यशाचा इतिहास रचला आहे. या मोहिमेसह, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिला आणि एकमेव देश ठरला. चांद्रयान-३ नंतर आदित्य एल-१ ची यशस्वी चाचणी आणि नंतर गगनयान उड्डाणाने ध्वज उंचावला. आता इस्रो पुन्हा इतिहास रचण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
पुढील दोन वर्षात इस्रो कोणत्या मोहिमा राबवणार याची माहिती समोर आली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सरकारने इस्रोच्या पुढील दोन वर्षांत सोडल्या जाणाऱ्या अंतराळ मोहिमेची माहिती दिली. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी २०२४ आणि २०२५ मध्ये ISRO कोणत्या मिशन पाठवण्याची योजना आखत आहे, हे सांगितले. यामध्ये निसार आणि गगनयान मिशनची सर्वाधिक चर्चा होत आहे. गगनयान मोहिमेत तीन जणांना अवकाशात पाठवले जाणार आहे. ही भारताची पहिली मानवी मोहीम असेल. या मोहिमेत हे यान पृथ्वीपासून ४०० किलोमीटर अंतरावरील कक्षेत ठेवण्यात येणार आहे. हे मिशन ३ दिवसांचे असेल. अंतराळात ३ दिवस घालवल्यानंतर सर्व अंतराळवीरांना समुद्रात सुखरूप उतरवून पृथ्वीवर परत आणले जाईल. या मोहिमेचे काम वेगाने सुरू आहे.
गगनयान मोहिमेचे पहिले चाचणी उड्डाण (TV-D1) ऑक्टोबरमध्ये प्रक्षेपित करण्यात आले. क्रू मॉड्यूलची चाचणी करणे हा त्याचा उद्देश होता. गगनयानच्या या चाचणीद्वारे अंतराळ प्रवासादरम्यान काही चूक झाली, तरी अंतराळवीर सुरक्षित राहतील याची चाचणी घेण्यात आली. २०२५ मध्ये भारतीयांना अंतराळात पाठवण्याचे गगनयान मिशनचे उद्दिष्ट आहे. मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सांगितले की, आगामी काळात गगनयान कार्यक्रमांतर्गत चाचणी उड्डाणांचे नियोजन करण्यात आले आहे.
इस्रोच्या आगामी अंतराळ मोहिमांमध्ये NISAR म्हणजेच सिंथेटिक अपर्चर रडार मिशनचाही समावेश आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासा यांच्या सहकार्याने इस्रो हे अभियान करत आहे. ड्युअल-फ्रिक्वेंसी रडार इमेजिंग उपग्रहाची रचना आणि प्रक्षेपण हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. नासाच्या म्हणण्यानुसार, यातून मिळणारा डेटा शास्त्रज्ञांना हवामान बदलाचे परिणाम चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी माहिती देईल. NISAR तीन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विकसित केले जात आहे. NISAR च्या मदतीने संपूर्ण पृथ्वीचे मॅपिंग १२ दिवसांत करता येते. हा उपग्रह जानेवारी २०२४ मध्ये सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केला जाईल, अशी अपेक्षा आहे.
निसार आणि गगनयान व्यतिरिक्त, इस्रो इतर अनेक मोहिमांवर काम करत आहे. मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, ISRO ने पुढील दोन वर्षांमध्ये या मोहिमा – इनसॅट-3DS, रिसॅट-1B, रिसोर्ससॅट-3, TDS01, SPADEX, Oceansat-3A, IDRSS, GSAT-20 आणि NVS-02 सुरू करण्याची योजना आखली आहे. या सर्व मोहिमांचे नेतृत्व भारतीय अंतराळ संस्था इस्रो करणार आहे. जितेंद्र सिंह पुढे म्हणाले की, अवकाश क्षेत्रात केलेल्या सुधारणांचा परिणाम दिसून येत आहे. स्पेस स्टार्ट-अपची संख्या २०१४ मध्ये १ वरून २०२३ मध्ये २०० पेक्षा जास्त झाली आहे. या भारतीय स्पेस स्टार्ट-अप्समध्ये $124.7 दशलक्षची गुंतवणूक देखील करण्यात आली आहे.



