गुन्हे

पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय: मार्केट यार्ड परिसरात दहशत

पुणे : मार्केट यार्ड भागातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगर परिसरात टोळक्याने कोयते, तलवारी उगारून दहशत माजविल्याची घटना घडली. टोळक्याने एका तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिली. घराच्या दरवाज्यावर कोयते आपटून नागरिकांना शिवीगाळ केली. याप्रकरणी राहुल उर्फ लल्या कांबळे (वय १९), शुभम कांबळे (वय २०), डुई ताकतोडे (वय २१), जग्या (चौघे रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) यांच्यासह तीन ते चार साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अरशद इस्माइल बागवान (वय १९, रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) याने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बागवानच्या भावाचा आरोपींशी वाद झाला होता. आरोपी रात्री बागवानच्या घराजवळ आले. त्यांनी तलवारी आणि कोयते उगारून दहशत माजविली. बागवानचे वडील, तसेच शेजारी राहणारे शालम शेख यांना कोयत्याचा धाक दाखविला. आम्ही आंबेडकरनगरचे दादा आहोत, अशी धमकी देऊन घराच्या दरवाज्यावर कोयते आपटून दहशत माजविली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button