गुन्हे

राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; वरळी आणि अंधेरीत छापेमारी

मुंबई : आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगानं महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. अवैध दारू निर्मिती, वाहतूक आणि विक्रीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागानं धडक मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत आज तब्बल १४ लाख रुपयांचे विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. वरळी आणि अंधेरीच्या लोखंडवाला परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. प्रत्येक पक्ष जोरदार प्रचार करत आहे. दुसरीकडे निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनानेही कंबर कसली आहे. अशात महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने वरळी आणि अंधेरी भागात छापेमारी केली. या ठिकाणी १४ लाख रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश काळे यांना गुप्त माहिती मिळाली होती. काळेंनी आपल्या टीमसह वरळी विभागात सापळा रचला. संशयित गाडी येताच त्यांनी थांबवली. कारचालक सतीश पटेलची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. कारझडतीत विदेशी दारूच्या २२ बाटल्या आढळून आल्या. दारूच्याच बाटल्या असल्याची पटेल यानं कबुली दिली.

यानंतर उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी पटेल यांच्या लोखंडवाला येथील घराचीही झडती घेतली. घरात विदेशी दारूच्या १८२ बाटल्या सापडल्या. त्यानंतर सतीश पटेलला अटक करण्यात आली आहे. विदेशातून दिल्लीत हा साठा आला होता. नंतर दिल्लीहून दारू रेल्वेनं मुंबईत आणण्यात आली. दिल्लीत उत्पादन शुल्क कमी असल्यानं प्रथम दिल्लीत दारू आणली जात असल्याची माहिती समोर आली आहे. मोहम्मद नावाच्या व्यक्तीचा सतीशकडे दारू तस्करीत सहभाग असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मोहम्मद अद्याप फरार असून उत्पादन शुल्क विभाग त्याचा शोध घेत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button