गुन्हे

पुण्यात ज्येष्ठ नागरिक बनताहेत चोरट्यांचे ‘टार्गेट’, स्वारगेट, कोथरुडमध्ये ज्येष्ठांना लुटले

पुणे : रस्त्याने पायी जाणाऱ्या वृद्ध महिलांचे दागिने हिसकावण्याचे प्रकार शहरात घडत आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांना हेरुन हातचलाखीने त्यांच्याकडील सोन्याचे दागिने लुटण्याच्या घटना पुणे शहरात वाढत आहेत. स्वारगेट आणि कोथरुड परिसरात दोन ज्येष्ठांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. स्वारगेट परिसरातील लक्ष्मी नारायण चौकाकडुन पंचमी चौकाकडे जाणाऱ्या एका ६० वर्षीय भाजी विक्रेता महिलेला दोन चोरट्यांनी लुटल्याची घटना घटना दुपारी साडे बाराच्या सुमारास घडली आहे. याबाबत ज्येष्ठ महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिला सातारा रोडवरून जात असताना एका साडी सेंटर दुकानासमोर दोघांनी त्यांना आडवले.

आजी तुम्हाला मी साडी घेऊन देतो, चला माझ्या सोबत. असे खोटे सांगून साडी देण्याचा बहाणाकरुन महिलेची दिशाभूल केली. तसेच अंगावरील दागिने काढून पिशवीत ठेवायला सांगितले. चोरट्यांनी वेफर्सचे पाकीटे असणारी पिशवी महिलेकडे देऊन त्यामध्ये दागिने ठेवण्यास सांगितले. चोरट्यांनी हात चलाखीने महिलेकडील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण ४५ हजारांचा ऐवज चोरून चोरटे पसार झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत. दुसरी घटना कोथरुड भागातील पौड रोड परिसरातील घडली आहे. याबाबत ६४ वर्षीय व्यक्तीने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे दिनांक ४ दुपारी दोनच्या सुमारास पौड रोडने पायी चालत जात होते. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आले. माझी आई मयत झाली आहे. तरी तीच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी मला ब्राह्माणाने सांगितले की, एका कॅरी बॅगमध्ये फुल व अगरबत्ती व दोन बिस्कीट पुडे दत्तमंदिरात दान कर.

त्याआधी त्याला सोनं लावण्यास सांगितले असून माझ्याकडे सोने नाही. तुमच्या हातातील सोन्याची अंगठी द्या. ज्येष्ठ नागरिकाने चोरट्यांवर विश्वास ठेवून २५ हजार रुपयांची अंगठी दिली. चोरट्यांनी हातचलखीने सोन्याची अंगठी घेऊन पसार झाले. फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने कोथरुड पोलिसांकडे तक्रार दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आळेकर करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button